रत्नागिरीत राज्यातील सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 11:59 AM2024-02-05T11:59:25+5:302024-02-05T12:00:07+5:30
रत्नागिरी : ढोल, ताशा, झांज, हलगी, घुमकं आणि तुतारीच्या निनादात शिवमय वातावरणात फटाक्यांच्या आतषबाजीत आणि हजारोंच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय ...
रत्नागिरी : ढोल, ताशा, झांज, हलगी, घुमकं आणि तुतारीच्या निनादात शिवमय वातावरणात फटाक्यांच्या आतषबाजीत आणि हजारोंच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्यातील सर्वांत उंच असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण रविवारी सायंकाळी करण्यात आले. रत्नागिरी शहरातील थिबा पाॅइंट येथे आयाेजित केलेल्या या साेहळ्याला रत्नागिरीकरांनी माेठी गर्दी केली हाेती.
या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिकारी तुषार बाबर, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, महिला शहरप्रमुख स्मितल पावसकर, माजी नगरसेविका दिशा साळवी, बाळू साळवी, गायक स्वप्निल बांदोडकर उपस्थित होते.
रंगीत विजेच्या दिव्यांचा झोत आसमंतातील काळोखात पाझरत जात होता. छत्रपतींच्या पुतळ्यावर होणारी फटाक्यांची आतषबाजी हजारो उपस्थितांचे डोळे दिपवत होती. गायक स्वप्निल बांदोडकर आणि ईशा पाटणकर यांच्या शिवमय गीतांनी वातावरण भारून गेले होते.
पालकमंत्री सामंत यांनी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून वंदन करून त्याचे लोकार्पण केले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करून राज्यातील सर्वांत उंच असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले.
त्यानंतर प्रतिक्रिया देताना मंत्री सामंत म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रत्नागिरीची भूमी आहे. हा पुतळा बसविताना मनस्वी आनंद होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. स्टॅच्यू ऑफ सिटी करण्यात रत्नागिरीला यश आलेले आहे.
भागाेजीशेठ कीर यांचा पुतळा उभारणार
दानशूर भागोजीशेठ कीर यांचा पुतळाही उभारण्याची घोषणा मंत्री सामंत यांनी केली. ते म्हणाले की, चार महिन्यांत या पुतळ्याचे लोकार्पण होईल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह महनीय व्यक्तींचा अभ्यास करण्यास पुढच्या पिढीला यातून मदत होणार आहे, असे ते म्हणाले.