रस्त्यासाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:27+5:302021-07-14T04:36:27+5:30
खेड : मुंबई - गोवा महामार्गाला पर्यायी असलेला तुळशी, विन्हेरे, महाड या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून वाहने ...
खेड : मुंबई - गोवा महामार्गाला पर्यायी असलेला तुळशी, विन्हेरे, महाड या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून वाहने नेताना कष्टप्रद प्रवास करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. कशेडी घाटात दुर्घटना घडल्यास पर्यायी रस्ता असलेल्या या मार्गाला सुस्थितीत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निवेदन कोकण विकास समितीतर्फे देण्यात आले आहे.
खड्डे चिखलमय
रत्नागिरी : शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांचे आकार पावसामुळे वाढू लागले आहेत. सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने या खड्डयांमध्ये साचलेल्या चिखलमय पाण्यातूनच वाहनांची ये-जा होताना नागरिकांना या पाण्याचा वर्षाव सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर वाहने आणि चालकांनाही या खड्ड्यातून जाताना त्रास होत आहे.
रानभाज्यांना मागणी वाढली
साखरपा : पाऊस सुरू होताच आता रानभाज्या मोठ्या प्रमाणावर उगवू लागल्या आहेत. ग्रामीण जनतेबरोबरच आता शहरातील नागरिकांनाही या रानभाज्यांचे आकर्षण असल्याने या भाज्यांना मागणी वाढली आहे. बाजारपेठेच्या ठिकाणी आता या रानभाज्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत.
फवारणी सुरू
रत्नागिरी : सध्या नगरपरिषदेने डास प्रतिबंधक फवारणी सुरू केली आहे. सध्या शहरात विविध ठिकाणी झाडी वाढू लागली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. डासांच्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता नगरपरिषदेने शहराच्या विविध भागामध्ये डास प्रतिबंधक फवारणीला प्रारंभ केला आहे.
रस्त्यावर तळे
रत्नागिरी : शहरातील नाचणे रोड येथील आठवडा बाजारालगतच्या तसेच आयटीआयसमोरील रस्त्यावर सध्या मुसळधार पावसामुळे तळे साचले आहे. जोरदार पाऊस सुरू असताना या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या पाण्यातून जाताना अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.