दापोलीच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 02:06 PM2022-02-17T14:06:03+5:302022-02-17T14:13:06+5:30
दापोली तालुक्याला निसर्गाचे मोठे वरदान
दापोली : तालुक्याचा पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा याकरिता दापोलीतील बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था, लाडघर यांच्यावतीने राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
दापोली तालुक्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. एका बाजूला हिरवेगार डोंगर तर दुसऱ्या बाजूला निळाशार समुद्र याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दापोलीकडे येतात. मुंबई व पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांमुळे तालुक्याचा आर्थिक स्तर उंचावत आहे. पर्यटकांची संख्या व त्यांचे मुक्कामाचे दिवस वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासन पातळीवर अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने विकास होणे आवश्यक आहे.
यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पां. वा. काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही तीन भारतरत्ने तसेच लोकमान्य टिळक, साने गुरुजी, रॅग्लर परांजपे, सरखेल कान्होजी आंग्रे या सर्वांचे दापोली तालुक्यात एकत्रित स्मारक उभे राहणे गरजेचे आहे. तारापोरवाला मत्स्यालयाच्या धर्तीवर दापोली कोकण कृषी विद्यापीठात मत्स्यालय उभारणे आवश्यक आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे
दापोलीत जैवविविधता पार्कची गरज आहे. दापोली तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ल्यावरून सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे उभारणे, तसेच शिवाजी महाराज व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर कायमस्वरूपी होलोग्रफिक अथवा लेझर शो करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.
साधारण सत्तर वर्षांपूर्वी या भागात बोट वाहतूक सुरू होती. दापोली तालुक्यात येण्यासाठी पर्यटकांना येण्यासाठी रेल्वे सुविधा नाही. त्यामुळे समुद्रमार्गे वाहतूक हा अतिशय सक्षम पर्याय आहे. याकडे यात लक्ष वेधण्यात आले आहे. दापोलीत विमानतळ तसेच खेडपासून दापोलीपर्यंत टुरिस्ट टॉय ट्रेनवरही यात भर देण्यात आला आहे.
पर्यटनाला उद्योगाचा दर्जा, पर्यटनस्थळी कोस्टगार्डची शासकीय टीम, समुद्रकिनाऱ्यावरील गावांमध्ये गोड्या पाण्याची उपलब्धता, भूमिगत वीजवाहिन्या, पर्यटनाच्या ‘क’ वर्गातील गावांचा ‘ब’ वर्गात समावेश, मार्केटिंगसाठी निधी, सीआरझेडमधून सूट मिळावी, अशा मागण्याही या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
एकत्रित स्मारक व्हावे
महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पां. वा. काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही तीन भारतरत्ने तसेच लोकमान्य टिळक, साने गुरुजी, रॅग्लर परांजपे, सरखेल कान्होजी आंग्रे या सर्वांचे दापोली तालुक्यात एकत्रित स्मारक उभे राहणे गरजेचे आहे.