राज्यातील मिनी लॉकडाऊनचा मंडणगडवर कोणताच प्रभाव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:33 AM2021-04-09T04:33:19+5:302021-04-09T04:33:19+5:30
०८आरटीएन०१.जेपीजी ०८आरटीएन०२.जेपीजी फोटो ओळी- मंडणगड शहरातील बाणकोटरोड पाटरोड, नगरपंचायत रस्ता अशा विविध भागात नेहमीप्रमाणे सुरू असलेल्या दुकानांची छायाचित्रे. लाेकमत ...
०८आरटीएन०१.जेपीजी
०८आरटीएन०२.जेपीजी
फोटो ओळी- मंडणगड शहरातील बाणकोटरोड पाटरोड, नगरपंचायत रस्ता अशा विविध भागात नेहमीप्रमाणे सुरू असलेल्या दुकानांची छायाचित्रे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : कोरोना रुग्णांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनचा मंडणगड तालुक्यावर कोणताच प्रभाव दिसत नाही. लॉकडाऊनचे पहिले तीनही दिवस तालुक्यातील बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.
गतवर्षी तालुक्यावर आलेल्या लाॅकडाऊन आणि निसर्ग चक्रीवादळ या दोन संकटांमुळे संपूर्ण तालुक्याची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. गतवर्षी आलेला दीर्घ लाॅकडाऊन आणि त्यातच आलेले चक्रीवादळ यामध्ये सर्वसामान्य नागरिक व व्यापारी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यानंतर सुरू झालेला पावसाळा आणि त्यानंतर शहराकडे परत गेलेले चाकरमानी यामुळे तालुक्यातील बाजारपेठा पूर्ण ओस पडल्या आहेत. व्यवसायातील नफ्यापेक्षा वादळात झालेल्या नुकसानाची भरपाई कशी करावी, यासाठी व्यापारी वर्ग प्रयत्नात आहे. चाकरमान्यांनी पाठवलेल्या पैशावर गावातील चुली पेटतात अशी स्थिती तालुक्याची असल्याने कोणत्याही व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्याची इच्छा राहिली नाही. प्रशासनाच्या वतीने सर्वांना लाॅकडावून पाळण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी व्यापारी दुकाने बंद ठेवण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे राज्यभरात सुरू झालेला लाॅकडाऊन मंडणगड तालुक्यात कुठेही पाहावयास मिळत नाही.
मार्च महिन्यात तालुक्यात रुग्णांचे अचानक वाढलेले प्रमाण, ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या कोरोना लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत आलेले अपयश या दोन कारणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता प्रशासन आग्रही असले तरी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आधीचे नुकसान भरून काढण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सहभाग नोंदविलेला नाही. स्थानिक परिस्थितीचा विचार करून व पूर्ण आठवडाभर लॉकडाऊनची आवश्यकता नसल्याने प्रशासनाने योग्य तो निर्णय घेत गतिमान होऊ पाहत असलेले अर्थचक्र परत ठप्प न करण्यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता व्यापारी बोलून दाखवत आहेत. साथ नियंत्रण व अर्थकारण न थांबणे अशा दुहेरी आव्हानांच्या कात्रीत स्थानिक प्रशासन सापडले आहे.
शहरातील आठवडा बाजार गेले चार आठवडे बंद आहे. त्यामुळे आता आठवड्याच्या समारोपास म्हणजेच शनिवार व रविवार या दोन दिवशी तालुक्यात पूर्ण लॉकडाऊनचे नियमांचे पालन होणार का याविषयी उत्सुकता लागली आहे.