महिला परिचरांचे राज्यव्यापी आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:29 AM2021-07-26T04:29:11+5:302021-07-26T04:29:11+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अंशकालीन महिला परिचर महासंघाच्या वतीने सोमवार, २६ जुलै रोजी करण्यात येणारे राज्यव्यापी आंदोलन ...
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अंशकालीन महिला परिचर महासंघाच्या वतीने सोमवार, २६ जुलै रोजी करण्यात येणारे राज्यव्यापी आंदोलन केवळ रत्नागिरी जिल्ह्यापुरते स्थगित करणयात आले आहे. रत्नागिरीतील कोरोनाची बिकट परिस्थिती पाहता हे आंंदोलन रत्नागिरी वगळता राज्यभर होणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र अंशकालीन महिला परिचर महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आकांक्षा कांबळे, सचिव सुप्रिया पवार यांनी ही माहिती आज येथे पत्रकारांना दिली. जिल्ह्यातील कोरोना आणि काही तालुक्यातील पूर परिस्थिती पाहता तसेच याबाबत जिल्हाधिकारी बी.एन. पाटील यांनी परिचर महासंघाच्या शिष्टमंडळाला रत्नागिरीमध्ये आंदोलन न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आंदोलन नोटीस स्वीकरताना संबोधित केले होते.
या सर्व बाबींचा विचार करून राज्याध्यक्षा मंगला मेश्राम नागपूर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात हे आंदोलन होणार नाही. ते स्थगित करण्यासाठी मान्यता दिली असल्याची माहिती या संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली. आंदोलन स्थगित करण्यात आल्यामुळे महिला परिचरांनी सोमवारी आंदोलनासाठी तालुक्यातून रत्नागिरीमध्ये येऊ नये, असेही स्पष्ट केले आहे.