रामनाथ मोते यांचा पुतळा पुढील पिढ्यांनाही प्रेरणा देईल : निरंजन डावखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:37 AM2021-09-07T04:37:27+5:302021-09-07T04:37:27+5:30
वाटूळ : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण जीवन दिलेल्या माजी आमदार रामनाथ मोतेंसारखे व्यक्तिमत्व समाजासाठी आदर्शवत आहे. कोकणातील शिक्षकांवर मोते सरांच्या ...
वाटूळ : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण जीवन दिलेल्या माजी आमदार रामनाथ मोतेंसारखे व्यक्तिमत्व समाजासाठी आदर्शवत आहे. कोकणातील शिक्षकांवर मोते सरांच्या कार्याचा उमटलेला ठसा कायम राहील, असे उद्गार कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी काढले. रामनाथ मोते यांचा हा अर्धपुतळा पुढील पिढ्यांनाही प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिक्षण क्रांती संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष रमेश निवृत्ती जाधव यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रा. अशोक बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश जाधव यांचा पत्नी शोभा जाधव यांच्यासह सत्कार करण्यात आला. राजापूर तालुक्यातील दत्तवाडी (डोंगर) येथील ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते रविवारी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ज्ञानप्रबोधिनी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप धुमाळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे, मोते सरांच्या कन्या दीपाली माहे, शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस, कोकण विभाग अध्यक्ष रमेश जाधव, स्मारक समितीचे संयोजक प्रसाद पंगेरकर, हेमंत खेमानी, जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, कार्यवाह राहुल सप्रे, प्रकाश कुलकर्णी, ज्ञानेश्वर गोसावी, एस. जी. पाटील आदींसह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
निरंजन ठावखरे म्हणाले की, रामनाथ मोते यांनी विधान परिषदेत दोनवेळा प्रतिनिधित्व करताना मुद्देसूद भाषणांनी शिक्षकांचे बहुसंख्य प्रश्न सोडवले. ते एखादा मुद्दा हाती घेऊन प्रशासनातील दिरंगाई, नियमांची त्रुटी आदींवर प्रकाश टाकत असत. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविषयी त्यांना कायम तळमळ होती, असे उद्गार आमदार डावखरे यांनी काढले.
यावेळी शिक्षण क्रांती संघटनेतर्फे गुणवंत शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी शिक्षकांच्या हक्कांसाठी मोते सर कायम जागरूक होते. शिक्षकांवर कधीही अन्याय होणार नाही, यासाठी ते सतर्क असत. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य करूया, असे आवाहन केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे यांनी मोते सरांच्या नेतृत्व गुणांबद्दल गौरवोद्गार काढले. माजी आमदार बाळ माने यांनी मोते सरांचा वारसा ही संघटना पुढे घेऊन जाणार, असा विश्वास व्यक्त केला. मोते सरांच्या पत्नी इंदुमती मोते यांनीही मनाेगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उदय कांबळे यांनी केले तर आनंद त्रिपाठी यांनी आभार मानले.