परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला?, बळीराजाच्या जीवाला अधिकच घोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 05:53 PM2020-10-20T17:53:03+5:302020-10-20T17:55:59+5:30
rain, farmar, ratnagirinews ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणारा पावसाचा परतीचा प्रवास लांबला असून मुक्काम वाढू लागला आहे. हवामाना खात्याने पुन्हा २१ ऑक्टोबरपर्यंत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणारा पावसाचा परतीचा प्रवास लांबला असून मुक्काम वाढू लागला आहे. हवामाना खात्याने पुन्हा २१ ऑक्टोबरपर्यंत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून सातत्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा पंधरवडा संपला तरी पावसाचा मुक्काम वाढू लागला आहे.
गेल्या आठवड्यात १३ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात चार दिवस मेघगर्जनेस, विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली होती. त्याचबरोबर शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.
यावेळी सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने भातशेती वेळेवर तयार झाली होती. त्यामुळे काहींनी भाताची कापणी करून घरी आणून पेंढ्या रचून ठेवल्या तर काहींचे पीक शेतातच उभे होते. या पावसाने उभे शेत आडवे केले तर रचून ठेवलेल्या भाताच्या पेंढ्याही पूर्णपणे भिजवून पिकाचे नुकसान केले. या संकटामुळे शेतकऱ्यांचे होते नव्हते ते पावसाने ओरबाडून नेले.
गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थोडासा थांबला आहे. त्यामुळे बळीराजा आता कापलेले भात कसेबसे घरात घेण्याच्या घाईत असतानाच आता पुन्हा सोमवारपासून हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने २१ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आता बळीराजाच्या जीवाला पुन्हा घोर लागून राहिला आहे.