उन्हाळी हंगामातील गर्दीने एसटीला तारले, रत्नागिरी अग्रस्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:54 AM2019-06-25T11:54:24+5:302019-06-25T11:55:49+5:30
उन्हाळी सुटीमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली होती. रत्नागिरी विभागाने योग्य नियोजन करून मुंबई विभागात अग्रस्थान प्राप्त केले आहे. गतवर्षी मे महिन्यात २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.
रत्नागिरी : उन्हाळी सुटीमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली होती. रत्नागिरी विभागाने योग्य नियोजन करून मुंबई विभागात अग्रस्थान प्राप्त केले आहे. गतवर्षी मे महिन्यात २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.
वर्षभरातील दीर्घ सुटीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने दि. १५ एप्रिल ते दि. १५ जूनपर्यंत दररोज ४७ मिळून एकूण २७२६ जादा गाड्यांचे नियोजन केले होते. शिवाय दररोज रत्नागिरी विभागातून दररोज १५० गाड्या मुंबई मार्गावर धावत होत्या.
एप्रिल महिन्यात रत्नागिरी विभागाचा ६६ लाख ६८ हजार किलोमीटर प्रवास झाल्याने २१ कोटी ६६ लाख ८ हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत ३ लाख ७ हजार किलोमीटरने प्रवास वाढला. शिवाय ३ कोटी ७१ लाख १७ हजाराने उत्पन्नात वाढले. मुंबई विभागात मुंबई, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी विभाग येतात. सहा विभागात रत्नागिरी विभाग उत्पन्नात प्रथम क्रमांकावर आहे. यावर्षी मुंबई विभागाचे एकूण उत्पन्न ९१ कोटी ७९ लाख १ हजार असून, गतवर्षी ८३ कोटी ७० लाख ११ हजार होते. गतवर्षीच्या तुलनेत ८ कोटी ८ लाख ९० हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.
मे महिन्यात रत्नागिरी विभागाने ८३ लाख १३ हजार किलोमीटर प्रवास करून ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळविले होते. गतवर्षी ८२ लाख १३ हजार किलोमीटर प्रवास करून २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षीच्या तुलनेत एक लाख किलोमीटर इतके अंतर वाढले, शिवाय २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांची उत्पन्नात वाढ झाली.
एप्रिल व मे या दोन्ही महिन्यात पाचही विभागात रत्नागिरी विभाग उत्पन्नात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. यावर्षी मुंबई विभागाचे एकूण उत्पन्न ११४ कोटी ९३ लाख ८४ हजार असून, गतवर्षी १०८ कोटी ८६ लाख २३ हजार होते. गतवर्षीच्या तुलनेत ६ कोटी ७ लाख ६१ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. रत्नागिरी विभागातील नऊ आगारामध्ये दापोली, खेड व गुहागर आगारांनीदेखील चांगले उत्पन्न मिळविले आहे.
एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यानंतर १५ एप्रिलपासून १६ जूनपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे फक्त निवडणुका कालावधीत तीन दिवस उन्हाळी जादा गाड्या बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे तीन दिवसात १४१ जादा गाड्या बंद होत्या. परंतु प्रत्येक आगाराकडून विशेष नियोजन करण्यात आल्यामुळेच रत्नागिरी विभागाने गतवर्षीच्या तुलनेत जादा उत्पन्न मिळविले शिवाय मुंबई विभागातही अग्रस्थानी राहिला आहे.
-विजय दिवटे,
विभाग नियंत्रक, रत्नागिरी.