हृदयविकाराचा मृत्यू रोखण्यासाठी रत्नागिरीत स्टेमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:50 AM2020-01-25T11:50:28+5:302020-01-25T11:54:06+5:30
रत्नागिरी : हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याच्या कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण राज्यात जास्त आहे. ते लक्षात घेता आता स्टेमी ...
रत्नागिरी : हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याच्या कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण राज्यात जास्त आहे. ते लक्षात घेता आता स्टेमी (ST Elevation in Myocardial Infarction) या प्रकल्पाच्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचाही समावेश करण्यात आला आहे.
कोरोनरी आर्टरी आजारामुळे ग्रामीण भागातील तीन ते चार टक्के आणि शहरी भागात आठ ते दहा टक्के व्यक्तिंना हृदयरोग होतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. ही परिस्थिती रोखण्यासाठी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुवर्ण तासात (गोल्डन अवर) मध्ये औषधोपचार करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट स्टेमी प्रकल्पातून केले जाणार आहे.
स्टेमी प्रकल्प राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सोलापूर आणि वर्धा या १० जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
या प्रकल्पामध्ये स्पोक व हब हे मॉडेल वापरण्यात येणार आहे. स्पोकमध्ये उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश असून, त्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि हृदयविकारासंबंधी अतितत्काळ सेवा दिल्या जातात, अशा रुग्णालयांचा समावेश आहे.
राज्यात ११० ठिकाणी स्पोक स्थापन करण्यात येणार असून, तेथे दोन खाटांचा अतितत्काळ विभाग सुरु करण्यात येईल. स्टेमी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना तत्काळ उपचाराची सुविधा मिळणार असून, त्यामुळे या आजारामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश येईल, असा विश्वास आरोग्ययमंत्री टोपे यांनी व्यक्त केला.
काय असेल या नव्या सुविधेत
स्पोकमध्ये ईसीजी यंत्र लावण्यात येईल. तेथे ईसीजी तंत्रज्ञ असेल. याठिकाणी रुग्ण आल्यावर त्याचा ईसीजी काढला जाईल आणि तो माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने क्लाऊड कनेक्टिव्हीच्या माध्यमातून तज्ज्ञांकडे पाठविला जाईल. तज्ज्ञांद्वारे औषधोपचाराबाबत दहा मिनिटांच्या आत मार्गदर्शन केले जाईल.
स्पोकमध्ये रुग्णांचा ईसीजी करुन हृदयविकाराचा झटका आला की नाही, याची तपासणी केली जाते. झटका आलेल्या रुग्णाला तत्काळ रक्ताची गुठळी पातळ करण्याचे औषध (थ्राँबोलिसिस) दिले जाईल. त्यानंतर त्या रुग्णाला हब येथे पुढच्या उपचारासाठी पाठविले जाईल.
पुढील उपचारांची व्यवस्था
हबमध्ये हृदयरोग तज्ज्ञ आणि हृदय शस्त्रक्रिया करण्याची सोय असलेल्या मोठ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया केल्या जातात, अशी वैद्यकीय महाविद्यालये, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सहभागी असलेली खासगी रुग्णालये यांचा यात समावेश आहे. राज्यात अशी २७ हब आहेत. हब येथे जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून हृदयविकाराच्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील.