पर्यटकांची पावले कोकणाकडे, पाच जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे ७० टक्के आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:39 PM2020-12-11T17:39:57+5:302020-12-11T17:41:33+5:30
tourism, Konkan, Ratnagirinews लॉकडाऊन शिथील होताच कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आहेत. पर्यटक निवासासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना प्रथम पसंती देत असल्याने सध्या कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे ७० टक्के आरक्षण झाल्याची माहिती विभागीय पर्यटन अधिकारी दीपक माने (कोकण विभाग) यांनी दिली.
रत्नागिरी : लॉकडाऊन शिथील होताच कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आहेत. पर्यटक निवासासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना प्रथम पसंती देत असल्याने सध्या कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे ७० टक्के आरक्षण झाल्याची माहिती विभागीय पर्यटन अधिकारी दीपक माने (कोकण विभाग) यांनी दिली.
कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर देशातील व्यवहार सुरळीत होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर आता लॉकडाऊन शिथील करण्यात आले असून, पर्यटनस्थळेही खुली करण्यात आली आहेत. मात्र, या कालावधीत पर्यटनच थांबल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एम. टी. डी. सी.) सर्व निवासस्थाने बंद होती. त्यामुळे महामंडळाचे करोडो रूपयांचे नुकसान झाले.
सप्टेंबर महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये बऱ्याच अंशी शिथिलता आली. त्यामुळे पर्यटनालाही हिरवा कंदील मिळाला. पर्यटकांसाठी पर्यटन महामंडळाने कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, वेळणेश्वर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, हरिहरेश्वर या पाच ठिकाणची आपली सर्व निवासस्थाने निर्जंतूक करून ठेवली होती. त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांच्या तपासणीसाठी ऑक्सिमीटर, थर्मल गन तसेच सॅनिटाईझरची व्यवस्था केली होती.
कर्मचाऱ्यांनाही शारीरिक अंतर तसेच कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, फेसशिल्ड, हॅण्डग्लोव्हज् आणि सॅनिटायझर आदी आवश्यक ती खबरदारी घेण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. त्यांची चाचणीही करण्यात आली. सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतल्याने आता पर्यटक पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. आताच ७० टक्के आरक्षण फुल्ल झाले असून, ही गर्दी आता ५ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून घरातच राहिलेले नागरिक आता दोन दिवसांसाठी का होईना पर्यटनासाठी जाण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे सलग दोन दिवसांची सुट्टी मिळताच फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे आता पर्यटन महामंडळाच्या निवासस्थानी गर्दी होऊ लागली असल्याचे विभागीय पर्यटन अधिकारी दीपक माने यांनी सांगितले.
ऑनलाईन आरक्षणाची सुविधा
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ऑनलाईन आरक्षणाचीही सुविधा उपलब्ध क़रून दिली आहे. आता प्रत्येक शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी मिळते. त्यामुळे या सुट्टीचा फायदा घेत, गेले आठ महिने घरातच राहिलेला पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडू लागला आहे.
सुट्टीचा फायदा
२५ डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आहे. या दिवशी शुक्रवार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जोडून सुट्टी आल्याने या सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा फायदा पर्यटकांना मिळणार आहे.