खालगाव ग्रामपंचायतीतर्फे निर्जंतुकीकरण माेहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:14 AM2021-05-04T04:14:06+5:302021-05-04T04:14:06+5:30
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव, जाकादेवी परिसरात कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याने खालगाव ग्रामपंचायतीतर्फे जाकादेवी परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. ...
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव, जाकादेवी परिसरात कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याने खालगाव ग्रामपंचायतीतर्फे जाकादेवी परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी तसेच बँक ऑफ इंडिया ते गारवा हॉटेल परिसरातील वस्तीचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला.
जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीचे डोस देणे, आरोग्य तपासणी करणे, दररोज कोरोना तपासणीचे नमुने घेणे, शिवाय अन्यही रुग्णांची ये-जा मोठ्या प्रमाणात येथे असते. विशेष म्हणजे तपासणी करणाऱ्या आरोग्य केंद्रातीलच दोन-तीन कर्मचारीही कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत आढळले. जाकादेवी केंद्रात अन्य गावांतूनही सर्वांत जास्त रुग्ण तपासणीसाठी येण्याचे प्रमाण अधिक आहे.
जाकादेवी आरोग्य केंद्राचे संपूर्ण कर्मचारी रुग्णांना सेवा देत आहेत. आतापर्यंत जाकादेवी आरोग्य केंद्रातर्फे एक हजार तीनशेपेक्षा अधिक कोरोना लसीचे डोस नागरिकांना नियोजन पद्धतीने देण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोर्तडे, पर्यवेक्षक सुषमा आचरेकर व त्यांचे कर्मचारी, ग्रामकृती दल, तंटामुक्त खालगाव समितीचे अध्यक्ष, माजी सैनिक मधुकर रामगडे, पोलीस पाटील प्रकाश जाधव, खालगाव विभागाचे बीट अंमलदार किशोर जोशी, महेश खापरे यांची टीम कार्यरत आहे.
परिसरात कोरोना संसर्गाची अधिक लागण होऊ नये, यासाठी उपाययोजना म्हणून खालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, बंटी सुर्वे, वैभव गोताड, संतोष धामणे, अर्जुन धामणे, शंकर रामगडे, विलास गोताड, शंकर गोताड यांनी निर्जंतुकीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.