अजूनही बेफिकिरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:32 AM2021-05-07T04:32:30+5:302021-05-07T04:32:30+5:30
मागील लॉकडाऊन वेळी मुंबई, पुण्यातील चाकरमानी गावी आल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, यावेळी तशी परिस्थिती नाही. याउलट ...
मागील लॉकडाऊन वेळी मुंबई, पुण्यातील चाकरमानी गावी आल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, यावेळी तशी परिस्थिती नाही. याउलट चाकरमानी अजूनही गावी त्या संख्येने आलेले नाहीत. मे महिन्यात उन्हाळी सुट्टीत गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी यावर्षी गावाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता त्यांनाही दोष देता येणार नाही. याचाच अर्थ गावपातळीवर होणारे कार्यक्रम व अन्य समारंभ त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. अन्यथा शहरात घोंगावणारा कोरोना खेड्यातील दऱ्याखोऱ्यात पोहचूच शकला नसता. त्यामुळे अशा कार्यक्रमात सहभागी होणारे लोकच कोरोनाचे खरे प्रसारक आहेत. त्यांनी अशा कार्यक्रमांवर वेळीच नियंत्रण आणायला हवे. त्यासाठी ग्रामपंचायत व ग्राम कृती दलाने सक्रिय होण्याची गरज आहे. तसेच जनजागृतीच्या माध्यमातून संबंधित लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. तरच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. अन्यथा ग्रामीण भागातील अपुऱ्या आरोग्य यंत्रणेत कोरोनाचा सामना करणे कठीण होईल. आजच्या घडीला शहरातील बहुतांश रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. हा सिलसिला असाच सुरु राहिल्यास ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. काही बाजारपेठेत गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जारी केली आहेत, तर काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल केले जात आहेत. याचाच अर्थ प्रशासकीय यंत्रणेवर येऊ घातलेला ताण लक्षात घेण्याची गरज आहे.
- संदीप बांद्रे