अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेबाबत अद्याप संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:22 AM2021-06-28T04:22:05+5:302021-06-28T04:22:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून शाळास्तरावर मूल्यांकनाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून शाळास्तरावर मूल्यांकनाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे; परंतु अकरावी प्रवेशासाठी सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) घेण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. मात्र, महाविद्यालयांना अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
शिक्षण विभाग, राज्य परीक्षा परिषद, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग यापैकी कोणी सीईटी परीक्षा घ्यायची याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे दहावीच्या परीक्षा रद्द करून सरसकट पास करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मूल्यांकनाद्वारे दहावीचा निकाल तयार करण्याच्या सूचना शाळांना प्राप्त झाल्या असून त्यानुसार शाळास्तरावर मूल्यांकनाचे काम सुरू आहे; परंतु अकरावी प्रवेशासाठी राज्यात सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जुलैमध्ये सीईटी परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी अद्याप परीक्षा कधी होणार, परीक्षेचे स्वरूप, पद्धती याबाबत काहीच मार्गदर्शक सूचना कनिष्ठ महाविद्यालयांना प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, दहावीच्या अभ्यासक्रमावर परीक्षा असणार असल्याने विद्यार्थी मात्र अभ्यासात व्यस्त झाले आहेत.
दहावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. अद्याप तारीख जाहीर झाली नसली तरी निकाल काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. निकालापूर्वी सीईटी परीक्षा घेतली असता, प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल. एकूणच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने सीईटी परीक्षा घेण्याबाबतची जबाबदारी निश्चित करून परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्याची आवश्यकता आहे.
--------------------
महाविद्यालयीन जीवनातील अकरावी प्रवेश हा मुलांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. मुलांना पास करण्याचा निर्णय झाला असला तरी सीईटीसाठी नेमका कोणत्या विषयांचा अभ्यासक्रम असणार आहे, याबाबत कोणत्याच सूचना प्राप्त नसल्याने मुलांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. लवकरात लवकर सीईटीची तारीख जाहीर करण्याची आवश्यकता आहे.
- साक्षी खेडेकर, पालक.
-------------------
दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची जबाबदारी अद्याप निश्चित केलेली नसून केव्हा घ्यावी याबाबतही सूचना नाहीत. लवकरात लवकर मार्गदर्शक सूचना जारी करण्याची आवश्यकता आहे.
- डाॅ. पी. पी. कुलकर्णी, प्राचार्य, गोगटे, जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी.
-------------------------
दहावीची परीक्षा रद्द करून अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, त्याबाबत अद्याप काहीच स्पष्ट सूचना नाहीत. शाळांनी निकाल घोषित करण्यापूर्वी परीक्षा घ्यावी. परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रमाबाबतही स्पष्ट सूचना जाहीर करण्याची आवश्यकता आहे.
- मृणाल पाटील, विद्यार्थिनी.
दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - २१८०६
मुलगे- ११२७८
मुली- २०५२८
जिल्ह्यातील एकूण कनिष्ठ महाविद्यालये - १४१
अकरावीसाठी प्रवेश क्षमता - २७,४२०
कला शाखा ७,३६० जागा
विज्ञान शाखा ७,६८० जागा
वाणिज्य ८,३६० जागा
संयुक्त ४,०२० जागा