पासबद्दल रत्नागिरीत मात्र अद्याप संभ्रम
By admin | Published: July 20, 2014 10:42 PM2014-07-20T22:42:40+5:302014-07-20T22:46:08+5:30
सेवानिवृत्तांमध्ये समाधान : कर्मचारी संघटनेच्या लढ्याला यश
रत्नागिरी : एस. टी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पाचशे रूपये भरून वर्षभर मोफत प्रवासाची सवलत राज्य परिवहनमंत्री मधुकर चव्हाण यांनी जाहीर केली. या जाहीर केलेल्या सवलतीमुळे सेवानिवृत्तांमध्ये समाधान पसरले आहे. परंतु रत्नागिरी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी या सवलतीपासून अद्याप संभ्रमात आहेत.
एस. टी. प्रशासनात सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मोफत वर्षभर पास मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. निवृत्त कर्मचारी संघटनेने केली होती. त्यासाठी परिवहन राज्यमंत्री मधुकर चव्हाण यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दोन महिने मोफत पाससह उर्वरित दहा महिने ५०० रूपये भरून सवलतीचा पास देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाचशे रूपयांमध्ये थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासह त्याच्या जोडीदारासही मोफत प्रवास करता येणार आहे. तसेच कर्मचारी मृत झाल्यास त्याच्या जोडीदाराला पास वापरता येणार आहे. परंतु या निर्णयाबाबत रत्नागिरी विभागातील सेवानिवृत्तांमध्ये संभ्रम आहे. एस. टी. प्रशासन दीड हजार कोटींचा संचित तोटा सोसत असतानाच सेवानिवृत्तांसाठी पास सवलतीचा घेतलेला निर्णय अनपेक्षित आहे. सध्या एस. टी.चे भारमान खालावलेले आहे. तरीही प्रशासनाने सेवानिवृत्तांसाठी जाहीर केलेल्या निर्णयामुळे भारमान वाढेलच शिवाय प्रत्येक सेवानिवृत्ताकडून ५०० रूपयेप्रमाणे एस. टी.च्या महसुलात काही प्रमाणात भर पडेल, असाही विचार मांडण्यात आला आहे. (प्रतिनिधी)