शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अद्याप संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:09+5:302021-05-08T04:33:09+5:30
रत्नागिरी : कोरोनामुळे विविध प्रवेश परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा सुरुवातीला पुढे ढकलण्यात आली ...
रत्नागिरी : कोरोनामुळे विविध प्रवेश परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा सुरुवातीला पुढे ढकलण्यात आली असली, तरी दि. २३ मे रोजी सद्यस्थितीत होणे शक्य नाही. मात्र, परीक्षा त्याच तारखेला होणार की, पुढे जाणार याबाबत अद्याप काहीच जाहीर करण्यात आलेले नसल्यामुळे पालक, विद्यार्थी यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. या वर्षी ही परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार होती. मात्र, कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. २३ मे रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य शिक्षण मंडळासह केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. याचबरोबर, जेईई, नीटच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सीए, सीएससारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वनियोजित तारखेला होणार की पुढे ढकलणार, याबाबत अद्याप तारीख मात्र जाहीर केलेली नाही.
परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, कधी, केव्हा, कशा पद्धतीने याबाबत काहीच निर्णय झाला नसल्याने, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी संभ्रमात आहेत. याबाबत शिक्षक परिषदेने परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना पत्र लिहिले असता, त्यांनी याबाबतचा निर्णय माझ्या अखत्यारित नसून, राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. अद्याप शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी मात्र अद्याप परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासात मग्न आहेत. सुट्टी असतानाही मुलांना शिष्यवृत्तीचा अभ्यास करावा लागत आहे.