तंटामुक्तीची अजून प्रतीक्षाच
By admin | Published: May 4, 2016 10:00 PM2016-05-04T22:00:25+5:302016-05-04T23:55:52+5:30
राजापूर तालुका : तंट्यातून मोकळा श्वास मिळणार कधी?
राजापूर : मागील ९ वर्षे राज्यात धडाक्यात राबविल्या जात असलेल्या महात्मा गांधी गाव तंटामुक्त योजनेला १ मे पासून सुरुवात झाली असली तरी मागील काही वर्षांच्या तुलनेत या कामामध्ये शिथिलता आली असून, राजापूर तालुक्यात तर काही गावे अद्यापही तंटामुक्त न झाल्याने ती केव्हा मुक्ततेचा श्वास घेणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
माजी उपमुख्यमंत्री व तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील दिवसागणिक वाढते अमाप तंटे व त्याचा कमी होणारा निपटारा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरु केली. या योजनेत सहभाग घेऊन तंटामुक्त होणाऱ्या गावांसाठी घसघशीत बक्षिसे ठेवण्यात आली होती. या योजनेला राज्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व असंख्य गावांनी परस्पर तडजोडी करत आपापसातील तंटे मिटवले व बक्षिसे मिळवली.
राजापूर तालुक्याने देखील तंटामुक्त योजनेत सहभाग घेत आपल्या यशाचा आलेख चढता ठेवला. मागील सहा ते सात वर्षामध्ये तालुक्यातील एकूण एकशेएक ग्रामपंचायतींपैकी साठ ते सत्तर गावे ही तंटामुक्त ठरली होती.
ही योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह््यात विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरलेली तीनही गावे ही राजापूर तालुक्यातील होती. जिल्ह््यात तंटामुक्त योजनेंतर्गत राजापूर तालुक्याचे काम उत्कृष्ट राहिले आहे.
मात्र, तालुक्यातील पाचल, रायपाटण अशा मोठ्या गावांसहीत अन्य काही गावे अजूनही तंटामुक्त झालेली नाहीत. परिणामी ही गावे शासकीय पातळीवरुन मिळणाऱ्या बक्षिसापासून वंचित राहिली आहेत. त्यामुळे चालू वर्षी तरी या वंचित असलेली ही गावे पुरस्कार पटकावण्याची संधी साधणार का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
राजापूर तालुका तंटामुक्ती अभियानावर एक कटाक्ष टाकल्यास असे दिसून येईल की, पहिली चार-पाच वर्षे नेटाने हे अभियान राबविले गेले. मात्र, मागील तीन ते चार वर्षे तालुक्यात या अभियानाचा मागमूसच नसल्याचे पुढे आले आहे. या कालावधीत फारशी गावे तंटामुक्त झालेली नाहीत. तालुकास्तरावर तहसील कार्यालयासहीत पोलीस ठाण्याच्या तंटामुक्त समित्यांच्या स्थापनाही झालेल्या नाहीत.
दि. १ मे रोजी गावांमध्ये ग्रामसभा घेऊन आपण या योजनेत सहभाग घेणार असल्याचे घोषित करायचे असते. पण तालुक्यातील राजापूर व नाटे या दोन्ही पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या किती गावांनी आपला सहभाग निश्चित केला ते कळू शकलेले नाही.
स्थानिक पोलीस यंत्रणेतही उदासीनता दिसून आली आहे. त्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त योजनेंतर्गत तालुक्यात तंटामुक्तीपासून वंचित असलेली गावे यावर्षी तरी पुरस्काराला पात्र ठरतील का, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)
तंटामुुक्त : किरकोळ वादही पोलीस ठाण्यापर्यंत...
राजापूर तालुक्यातील काही गावांमुळे राजापूर तालुका तंटामुक्त होण्यात अडचण निर्माण होत आहे. या गावांमध्ये उद्भवणाऱ्या किरकोळ तंट्यांचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत जात असून, त्यामुळे संपूर्ण तालुका तंटामुक्त होऊ शकलेला नाही. किरकोळ वादही पोलीस ठाण्यापर्यंत जात असल्याने त्या-त्या ठिकाणच्या तंटामुक्त समित्यांनी आता याबाबत जागृती करणे गरजेचे आहे.
४० गावे प्रतीक्षेत...
राजापूर तालुक्यातील जवळपास ४० गावे अद्याप तंटामुक्त होणे बाकी आहेत तर जवळपास ६० ते ७० गावे तंटामुक्त झाली आहेत. उर्वरित गावे तंटामुक्त होणार कधी? असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.