सीसीटीव्हीच्या आधारे शोधला चोरीला गेलेला डंपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 03:41 PM2021-03-19T15:41:30+5:302021-03-19T15:42:44+5:30
Crime News Ratnagiri police-मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी नजीकच्या पेट्रोलपंपातून चोरीला गेलेला डंपर ग्रामीण पोलिसांच्या सातत्यपूर्ण तपासामुळे आहे त्या स्थितीत बेळगाव येथील एका गावात सापडला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या डंपरचा योग्य मार्ग शोधून काढला आणि डंपर हाती सापडला. विशाल पास्ते असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांच्या या तपास पद्धतीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी नजीकच्या पेट्रोलपंपातून चोरीला गेलेला डंपर ग्रामीण पोलिसांच्या सातत्यपूर्ण तपासामुळे आहे त्या स्थितीत बेळगाव येथील एका गावात सापडला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या डंपरचा योग्य मार्ग शोधून काढला आणि डंपर हाती सापडला. विशाल पास्ते असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांच्या या तपास पद्धतीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ फेब्रुवारी रोजीच्या पहाटे शेखर म्हाप यांच्या मालकीचा डंपर (एमएच ०८, एपी ५०१५) चोरट्याने पळविला होता. सकाळी डंपर गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दिली होती. विनीत चौधरी यांनी तपासाला सुरुवात करत कोकणातील विविध पोलीस स्थानकात डंपर चोरी प्रकरणात कोणाला अटक केले आहे का याची चौकशी केली. त्यावेळी त्यांना कणकवली पोलिसांनी विशाल पास्ते याला अटक केल्याची माहिती मिळाली होती.
कणकवली पोलिसांकडून विशालला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने डंपर चोरीची कबुली दिली आहे. मात्र, त्याने हा डंपर अन्य व्यक्तीला विकल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार तपास सुरू होता. हातखंबा-बेळगाव मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज पाहून बैलहोंगल तालुक्यातील चिक्क बागेवाडी येथे हा डंपर सापडला. मात्र, कणकवली येथून ज्या विशालने ज्याला डंपर विकला होता तो अद्यापही सापडलेला नाही.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस कर्मचारी एस. बी. काशित, एस. बी. कांबळे, व्ही. एस. शेटकर यांनी ही कामगिरी केली आहे.
हातखंबा ते बेळगाव मार्गावर तपास
एकीकडे चौधरी अन्य डंपर चोरीच्या घटनांचा मागोवा घेत असताना त्यांची एक टीम मात्र हा डंपर नेमक्या कोणत्या रस्त्याने गायब झाला याच्या तपासाच्या मागे लागली होती. पोलिसांनी हातखंबा ते बेळगाव या मार्गावरील सर्व पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी उगार मिरज रोडच्या बाजूला असलेल्या एसआर कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या फुटेजची तपासणी केली. त्यावेळी चोरीला गेलेला डंपर उगार गावाच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून शोध घेत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.
शेडमध्ये सापडले डंपरमधील काही साहित्य
डंपरचा शोध सुरू असतानाच उगार गावाच्या परिसरात हॉटेल सृष्टीसमोर एका शेडमध्ये रेडियमचे तुकडे, टायरचे मार्क दिसून आले. यावेळी तपासात ग्रामीण पोलिसांसोबत डंपर मालकही होता. त्याने खात्री केल्यानंतर पोलिसांचा खाक्या पाहून संबंधित शेड मालकाने शेड उघडून दाखविली. त्यानंतर डंपरमधील काही साहित्य तेथे मिळाले. त्यामुळे डंपरच्या मार्गाची निश्चिती झाली होती. यावेळी डंपर बैलहोंगल तालुक्यातील चिक्क बागेवाडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रस्त्याच्या बाजूला उभा असलेला डंपर ताब्यात घेण्यात आला.