रत्नागिरीत वर्षभरात पावणे दोन कोटीची चोरटी दारु जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 19:10 IST2025-04-08T19:09:45+5:302025-04-08T19:10:12+5:30
आर्थिक वर्षात १४ वाहने जप्त; चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

संग्रहित छाया
रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्कच्या येथील अधीक्षक कार्यालयाने सरत्या आर्थिक वर्षात मद्याच्या अवैध विक्रीवर कारवाई करत १,२७४ गुन्हे दाखल करून १ काेटी ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यात १४ वाहने जप्त करण्यात आली असून, चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यारत्नागिरीच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी अवैध मद्यविक्रीविराेधात धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. शरीराला घातक असलेल्या हातभट्टीच्या दारूचे उत्पादन जिल्ह्यात काही ठिकाणी केले जाते. हातभट्टीची दारू हानीकारक असल्याने या प्रकारच्या दारूच्या निर्मिती आणि विक्रीवर कठोर कारवाई करण्यात येते. येथील उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कार्यालयाकडून हातभट्टीच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकून नष्ट केली आहेत.
तसेच रत्नागिरीत नजिकच्या गोवा राज्यातून स्वस्त मिळणाऱ्या मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे इथल्या महसुलावर परिणाम होतो. त्यामुळे परराज्यातील मद्य वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही काहीजण अवैधरीत्या गोवा बनावटीचे मद्य जिल्ह्यात आणतात. त्यामुळे जिल्ह्याचा महसूल बुडतो. त्यामुळे अवैद्य मद्य वाहतुकीवर या कार्यालयाने गेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात धडक कारवाई केली आहे.
या वर्षात या कार्यालयाने १२७४ गुन्हे नोंदविले. यापैकी १०४२ गुन्ह्यांचा शोध लागला, तर २३२ बेवारस गुन्हे आहेत. यात विविध प्रकारचे २९,१६२ लिटर मद्य जप्त करण्यात आले. तर परराज्यातील ३५४३.३ लिटर मद्य, असे एकूण ३२,७०६ लिटर मद्य जप्त करण्यात आले. या कारवाईत तब्बल २,८५,८५० लिटर रसायन नष्ट करण्यात आले.
- एकूण गुन्हे : १,२७४
- अटक आरोपी : ४
- जप्त वाहने : १४
- वाहनांची किंमत : ७,३०,००० रुपये
- कारवाईत पकडलेली दारू (लिटर)
- हातभट्टीची दारू : २८,१८९
- देशी : ५०७.०६
- विदेशी : ३३६.५६
- बिअर : ८३.८५
- ताडी : ४६
- परराज्यातील : ३,५४३
- रसायन जप्त : २,८५,८५०