कोल्हापूर येथील चोरीला गेलेली दुचाकी ११ महिन्यांनी सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 07:27 PM2021-02-22T19:27:22+5:302021-02-22T19:29:44+5:30
BikeChori CrimeNews Ratnagiri- कोल्हापूर, राजारामपुरी येथून ११ महिन्यांपूर्वी चोरीला गेलेल्या एक्सेज दुचाकी मालकाचा लांजा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना दुचाकी परत केली आहे. तपास करणाऱ्या महिला पोलीस नाईक प्रमिला गुरव यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
लांजा : कोल्हापूर, राजारामपुरी येथून ११ महिन्यांपूर्वी चोरीला गेलेल्या एक्सेज दुचाकी मालकाचा लांजा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना दुचाकी परत केली आहे. तपास करणाऱ्या महिला पोलीस नाईक प्रमिला गुरव यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
लांजा शहरातील हेरिटेज इमारतीच्या पार्किंग जागेमध्ये दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी काळ्या रंगाची नवीन एक्सेज गाडी येथील रहिवासी यांच्या निदर्शनास आली. इमारतीच्या कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर तांबे यांनी लांजा पोलीस स्थानकात यांची माहिती दिली. त्यानंतर महिला पोलीस नाईक प्रमिला गुरव यांनी बेवारस असलेली दुचाकी ताब्यात घेतली.
याचा तपास करताना त्यांनी रत्नागिरी आरटीओ यांना पत्रव्यवहार करून गाडीचा नंबर मिळविला. त्यानंतर कोल्हापूर येथील आरटीओ व कोल्हापुरातील गुन्हा अन्वेषण विभागाशी पत्रव्यवहार करून गाडीच्या नंबरवरून गाडीमालकाची माहिती मिळविली. या नंबरवरून कोल्हापुरातील राजोपाध्येनगर येथील शब्बीर इमाम परस यांच्या मालकीची ही गाडी असल्याची माहिती मिळाली. त्यांनी दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद दि. १० मार्च २०२० रोजी दिली होती.
कोल्हापूर येथून ही गाडी चोरून लांजा शहरातील हेरिटेज इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी ठेवून पोबारा केला होता. गाडीचा मालक लक्षात आल्यानंतर दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्रव्यवहार करून आपल्या मालकीची असलेली दुचाकी आपल्या ताब्यात घेण्याचे पत्र पाठविण्यात आले. त्यानंतर मालक शब्बीर परस यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यांचे कॉन्स्टेबल अनिल चिले यांना सोबत घेऊन शनिवारी लांजा पोलीस स्थानकात दाखल झाले. त्यानंतर त्यांना ही गाडी ताब्यात देण्यात आली.