दगड कोसळून महिलेचा मृत्यू

By admin | Published: October 30, 2014 12:45 AM2014-10-30T00:45:48+5:302014-10-30T00:46:25+5:30

महिला कऱ्हाडची : आंबोली धबधब्यातील घटना

Stone collapses woman's death | दगड कोसळून महिलेचा मृत्यू

दगड कोसळून महिलेचा मृत्यू

Next

सावंतवाडी : अंबोली येथील मुख्य धबधब्यावर नातेवाइकांसह पर्यटनासाठी आलेल्या कऱ्हाड येथील क्रांती सतीश दोडगे (वय ३५) यांच्या डोक्यावर दगड कोसळल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना तत्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्यावरील खोल जखमेतून अतिरक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
अंबोलीत सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. आज, बुधवारी सायंकाळी डोक्यावर दगड कोसळून जखमी झालेल्या पर्यटक महिलेच्या मृत्यूमुळे अंबोली येथील पर्यटनातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कऱ्हाड येथील क्रांती दोडगे यांच्यासह अकराजण आज, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तवेरा गाडीने अंबोली व गोवा येथे पर्यटनासाठी आले होते. अंबोली येथील अन्य पर्यटनस्थळे फिरल्यानंतर ते सारेजण सायंकाळी चारच्या सुमारास अंबोली मुख्य धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी पोहोचले. परतीच्या पावसामुळे येथील धबधब्यामध्ये अजूनही पाण्याचा प्रवाह मुबलक आहे.
क्रांती दोडगे यांच्यासह सर्वजण मुख्य धबधब्यावर आनंद लुटत असताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर धबधब्यातील एक दगड त्यांच्या डोक्यावर कोसळला. यामुळे त्यांच्या डोक्यात खोलवर जखम झाली आणि रक्तस्राव होऊ लागला. त्यांच्यासोबत असलेले अशोक गायकवाड, सुनीता गायकवाड, विश्रांती लोखंडे, कविता गायकवाड, प्रशांत गायकवाड, श्रेया लोखंडे, संस्कृती लोखंडे यांच्यासह आंबोलीतील स्थानिकांनी त्यांना तत्काळ तवेरा गाडीतून सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. क्रांती यांचे पती पुणे येथे रिक्षा व्यवसाय करतात. सध्या क्रांती बहिणीसोबत कऱ्हाड येथे राहायला होत्या. आज सकाळी त्या बहीण, मावशी, मावस भाऊ आणि अन्य नातेवाइकांसह अंबोली येथे पर्यटनासाठी आल्या होत्या.
अंबोली पर्यटनातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अंबोली येथे लाखो पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे. येथील रेलिंग, रस्त्याच्या बाजूच्या दरडींवर व धबधब्यांवर जाळी बसविण्याची मागणी वेळोवेळी करण्यात येते; परंतु प्रशासनाकडून अद्यापही याकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे. अशा घटनांनंतर तरी पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.

Web Title: Stone collapses woman's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.