रत्नागिरी: कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक, मंडणगड तालुक्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 02:04 PM2022-09-30T14:04:57+5:302022-09-30T14:05:16+5:30
गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी वन खात्याकडून मौन पाळले जात आहे.
मंडणगड : खैर तोडीबाबत कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या वनविभागातील एका कर्मचाऱ्यावर दगडफेक केल्याचा प्रकार मंडणगड तालुक्यातील लाटवण कादवण परिसरात मंगळवारी घडला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी वन खात्याकडून मौन पाळले जात आहे.
तालुक्यातील लाटवण कादवण परिसरात खैराची तोड होत असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्याची माहिती घेण्यासाठी ते या परिसरात गेले. मात्र तेथे त्यांच्यावर बेचकीच्या सहाय्याने दगडफेक करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी झाला. त्यानंतर वन खात्याने अनेक अधिकारी, कर्मचारी मंडणगडमध्ये दाखल झाले. त्यांनी सुमारे दोन लाखांची खैराची तोडलेली झाडे जप्त केली असल्याचे समजते.
याप्रकरणी मंडणगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा अज्ञातांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. मात्र मंडणगड तालुका वनविभाग आणि मंडणगड पोलीस स्थानकाकडून मात्र याबाबत मौन पाळले जात आहे. नेमका काय प्रकार झाला, याची कसलीही माहिती दिली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही दगडफेक कोणी केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.