तात्पुरत्या आरोग्य भरतीचा फार्स थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:31 AM2021-04-22T04:31:55+5:302021-04-22T04:31:55+5:30

रत्नागिरी : आरोग्य विभागात असंख्य जागा रिक्त असताना सरकार केवळ तात्पुरत्या नेमणुका करुन आरोग्य यंत्रणा सुस्थितीत असल्याचा फार्स करत ...

Stop the farce of temporary health recruitment | तात्पुरत्या आरोग्य भरतीचा फार्स थांबवा

तात्पुरत्या आरोग्य भरतीचा फार्स थांबवा

Next

रत्नागिरी : आरोग्य विभागात असंख्य जागा रिक्त असताना सरकार केवळ तात्पुरत्या नेमणुका करुन आरोग्य यंत्रणा सुस्थितीत असल्याचा फार्स करत आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे. ही फसवणूक तत्काळ थांबवून कायमस्वरुपी भरती केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रत्नागिरीच्या आरोग्य व्यवस्थेत पुरेसे मनुष्यबळ नाही. रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्ड बॉय आणि अन्य कर्मचारी यांची वानवा सातत्याने असल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असताना लोकप्रतिनिधी, महाआघाडी शासन बेफिकीर आहे. भाजपवर राजकारण करण्याचा आरोप केला की, सगळे अपयश माफ होते, अशा समजुतीत सत्ताधीश मश्गुल आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

गेले अनेक महिने आरोग्य व्यवस्थेत खूप जागा रिक्त आहेत. अगदी गळ्याशी आले की, तात्पुरती भरती करण्याची घोषणा करणे, हा खेळ झाला आहे. कोरोनासारख्या महामारीत धोका पत्करून २ आणि ३ महिन्यांसाठी कोणतीही भविष्याची हमी, सुरक्षितता नसताना, धोका पत्करून आरोग्य यंत्रणेत अल्प मोबदल्यावर काम करायला लावणे म्हणजे गरजू बेरोजगारांची चेष्टा आहे. जाहिरात देऊनही माणसे मिळत नाहीत, असे म्हणायला यंत्रणा तयार असते. परत तात्पुरती भरती होणार, अशी माहिती पुढे आली आहे. हा खेळ थांबवून रितसर भरती केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तात्पुरती भरती हा बेरोजगार तरुणांना धोक्यात टाकण्याचा खेळ आहे. कोरोनाच्या या अवघड कालावधीत रूजू होणाऱ्या व्यक्तिंना भविष्यात भरतीत प्राधान्य देण्याचे आणि त्यांना गरज लागली तर मोफत उपचार देण्याची हमी घोषित करावी. एका बाजूला नागरिकांचे आरोग्य आणि दुसऱ्या बाजूला तात्पुरत्या रोजगाराचे फसवे मायाजाल दाखवून चाललेली फसवणूक तत्काळ थांबवावी. रिक्त जागा भरण्याच्या खऱ्या मानसिकतेने भरती अभियान राबवले तरच हा अनुशेष भरून आरोग्य व्यवस्थेचा भार हलका होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Stop the farce of temporary health recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.