रत्नागिरी स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:35 PM2018-05-06T23:35:16+5:302018-05-06T23:35:16+5:30
रत्नागिरी : दादर-मुंबईहून रविवारी पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात आलेली पॅसेंजर गाडी पुढे मडगावपर्यंत गेलीच नाही. यामुळे शेकडो प्रवासी रत्नागिरी स्थानकातच अडकून पडले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रविवारी पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ आकस्मिक रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना समजावत त्यांची ओखा व कोकणकन्या एक्स्प्रेसने मडगावला रवानगी केली.
गेल्या दोन वर्षांपासून दररोज दादर येथून सायंकाळी ३.३० वाजता सुटणारी व रत्नागिरीत रात्री १२.३० ते १.३० वाजण्याच्या दरम्यान येणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा रत्नागिरीतून मडगावपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. मात्र, ४ मे पासून रत्नागिरी ते मडगाव व मडगाव ते रत्नागिरी अशी या गाडीची फेरी बंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कोकण रेल्वेच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. परंतु, ही माहिती प्रवाशांपर्यंत अद्याप पोहोचलेली नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.
दादर पॅसेंजरने रत्नागिरी व पुढे सावंतवाडी ते मडगावपर्यंत जाण्यासाठी अनेक प्रवासी त्यांच्या कुटुंबियांसमवेत शनिवारी या गाडीने निघाले होते. शनिवारी सायंकाळी मुंबईतून निघालेली ही पॅसेंजर रेल्वे रविवारी मध्यरात्री १.३० वाजता रत्नागिरी स्थानकात आली.
मात्र, ही गाडी मडगावकडे जात नसल्याने पुढे जाणारे शेकडो प्रवासी रत्नागिरी स्थानकातच अडकले. ही गाडी मडगावपर्यंत सोडण्यासाठी प्रवाशांनी स्टेशनमास्तरांकडे मागणी केली. मात्र, पहाटे ४ वाजेपर्यंत प्रवाशांची काहीच व्यवस्था झाली नाही.
संतापाचा बांध फुटला
रत्नागिरी पॅसेंजर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास
दादर-मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झाली. त्यामुळे रात्रभर स्थानकावर ताटकळलेल्या प्रवाशांच्या संतापाचा बांध फुटला. पहाटे ४ वाजता सुमारे ३०० ते ४०० पुरुष प्रवासी रेल्वे रुळावर उतरले. पूर्ण ट्रॅक अडविण्यात आला. अचानकपणे रेल्वे प्रवाशांनी केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनही अडचणीत आले. रेल्वे पोलीस व रत्नागिरी पोलिसांना स्थिती हाताळण्यासाठी पाचारण करण्यात आले.
अधिकाºयांनी घातली समजूत
अचानक रेल्वे रोको उद्भवल्यानंतर कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंडे अन्य अधिकाºयांसमवेत पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकावर आले. त्यांनी प्रवाशांची समजूत घातली. रत्नागिरी-मडगावदरम्यान मांडोवी व झुआरी रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रत्नागिरीतून मडगावकडे जाणारी ही गाडी येत्या ३० मे पर्यंत बंद करण्यात आली आहे. अखेर अधिकाºयांनी या प्रवाशांची सकाळी ६ वाजता ओखा एक्स्प्रेस व कोकणकन्याने मडगावकडे रवानगी केली.