ताैक्ते वादळामुळे जिल्ह्यातील २,४३७ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:43+5:302021-06-06T04:23:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळातील बाधित बागायतदारांचे पंचनामे पूर्ण झाले असून, १२ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळातील बाधित बागायतदारांचे पंचनामे पूर्ण झाले असून, १२ हजार २६ शेतकऱ्यांचे २ हजार ४३७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्ह्याचे १२ कोटी १२ लाख १४ हजार ६१५ रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तौक्ते चक्रीवादळाचा किनारपट्टीलगतच्या गावांना जास्त फटका बसला आहे. राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर तसेच लांजा तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे.
रत्नागिरी तालुक्यामध्ये वादळाचा प्रभाव सर्वाधिक राहिला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, झाडावरील आंबे गळून पडले. हंगामातील शेवटच्या टप्प्यातील उत्पन्न जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. २ हजार ४३७.९७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शासनाच्या जुन्या निकषानुसार हेक्टरी १८ हजार रूपयांप्रमाणे मदत मिळणार होती. त्यानुसार जिल्ह्याला ४ कोटी ३६ लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, शासनाने मदत तिप्पट करण्याचा निर्णय घेतला असल्याने ७ कोटी ७२ लाखांची त्यामध्ये भर पडली आहे. मात्र, नवीन निकषानुसार हेक्टरी ५० हजार रूपयांप्रमाणे १२ कोटी १२ लाख १४ हजार ६१५ रूपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
सर्वाधिक नुकसान रत्नागिरी तालुक्यात झाले असून, एकूण ३,१२८ शेतकऱ्यांचे ४ कोटी ४७ लाख ६१ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ संगमेश्वर तालुक्यात २,३५० शेतकऱ्यांचे २ कोटी १० लाख ७५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर राजापूर तालुक्यातील १,७६५ शेतकऱ्यांना एक कोटी ७९ लाख ८८ हजार रूपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे.
----------------------
ताैक्ते वादळातील नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. नवीन निकषाप्रमाणे पंचनाम्याचे अहवाल तयार करण्यात आले असून, ते जिल्हा प्रशासन व कृषी आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहेत.
- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.
-----------------------
तालुका शेतकरी नुकसान
मंडणगड ४४ ६ लाख ५८ हजार ०८०
दापोली ९२५ ४२ लाख
खेड ५९७ २९ लाख ९ हजार ८४०
चिपळूण १२९६ ९१ लाख ९ हजार ८४५
गुहागर ५९७ ३८ लाख ८६ हजार
संगमेश्वर २३५० २ कोटी १० लाख ७५ हजार
रत्नागिरी ३१२८ ४ कोटी ४७ लाख ६१ हजार
लांजा १३२४ १ कोटी ६६ लाख २५ हजार े
राजापूर १७६५ १ कोटी ७९ लाख ८८ हजार