राजापूर किनारपट्टीला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:30 AM2021-05-17T04:30:45+5:302021-05-17T04:30:45+5:30
राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा राजापूर तालुक्यात रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान प्रवेश झाला आणि किनाऱ्यावर लाटा उसळू लागल्या़ ...
राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा राजापूर तालुक्यात रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान प्रवेश झाला आणि किनाऱ्यावर लाटा उसळू लागल्या़ किनाऱ्यालगत असलेल्या नाटे, सागवे, साखरीनाटे, आंबोळगड, दळे, वाडापेठ, मुसाकाझी, कशेळी गावांना जोरदार तडाखा बसला़ वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी घरे व गोठ्याची पडझड झाली आहे. काही ठिकाणी घरावर वृक्ष कोसळून नुकसान झाले आहे़ मात्र, तालुक्यात काेठेही जीवितहानी झालेली नाही़
तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात सागवे येथे दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला होता़ पावसाचा जाेरही वाढला हाेता़ राजापूरमध्ये हे वादळ आल्यानंतर तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोळगड, मुसाकाझी परिसरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर पाऊसही सुरू झाला आहे.
कारिवणे गावात गणपत गोकुळ नाकटे यांच्या घराची एक बाजू कोसळून नुकसान.
जीवितहानी झालेली नाही त्यांना नातेवाइकाकडे स्थलांतरित करण्यात आले, तर जैतापूर व जुवे जैतापूर या गावांना या वादळाचा जोरदार तडाखा बसला. जैतापूर येथे घरांवर माड पडून बऱ्याच जणांचे नुकसान झाले, तर काहींच्या घरांचे पत्रे, कौले उडाली आहेत़ मात्र, कोठेही जीवितहानी झालेली नाही. होळी गावातसुद्धा घरांवर माड व इतरही झाडे पडून नुकसान झाले आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने आंबोळगड येथील ६८ कुटुंबांतील २५४ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते. मुसाकाझी येथील दोन कुटुंबांचे, तर आवळीचीवाडी येथील सात कुटुंबातील ३५ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
राजापूर डोंगर मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती़ मात्र, प्रशासनाने झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर केले. या वादळाने राजापूर शहराला तडाखा दिला असून, वादळाला वारे हळूहळू रत्नागिरीकडे सरकत आहेत. या वादळचा पुढे सरकण्याचा वेग ताशी सात किलोमीटर एवढा हाेता़ सायंकाळी पाचच्या सुमाराला हे वादळ रत्नागिरीच्या दिशेने सरकल्यानंतर वाऱ्याचा वेग काहीसा कमी झाला हाेता़