वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:20 AM2019-06-12T11:20:43+5:302019-06-12T11:23:43+5:30
गेल्या २४ तासात जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या असून, पाचल येथे युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.
रत्नागिरी : गेल्या २४ तासात जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या असून, पाचल येथे युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.
मान्सूनच्या पावसाने अजूनही पाठ फिरवली आहे. मात्र, सोमवारपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे काही भागात वादळी वारे वाहू लागले आहेत. गेल्या २४ तासात राजापूरवगळता इतर तालुक्यात पाऊस झाला नसला तरी या वाऱ्यामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या आहेत.
राजापूर तालुक्यात ३५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. १ ते ११ जून या कालावधीत जिल्ह्यात केवळ ७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. राजापूर तालुक्यातील पाचल येथील शशी लक्ष्मण खेडेकर हा २४ वर्षीय तरूण पोहण्यासाठी अर्जुना धरणामध्ये गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरातील जिल्हा न्यायालयानजीक मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक एलआयसी कार्यालयमार्गे वळवण्यात आली होती. हे झाड बऱ्याच वेळाने बाजूला करण्यात आले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात झालेल्या नुकसानाच्या प्राथमिक अहवालानुसार, वादळी वाऱ्यामुळे खेड तालुक्यातील वावेतर्फ नातू येथे चार घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
यात सावित्री कदम यांचे १८२० रूपये, पार्वती डांगे यांचे ५९१५ रूपये, सरस्वती भांबड यांचे ९५४० रूपये तसेच मारूती डांगे यांचे २५८० रूपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात वेहळे येथील तीन घरांचे अंशत: नुकसान झाले असून, मानसिंग राजेशिर्के यांचे ९००० रूपयांचे, सुरेश सिंगे यांचे ८७५० रूपयांचे, तर गोपाळ भोजने यांचे ९००० रूपयांचे नुकसान झाले आहे.
पावसाच्या सरी
मंगळवारीही काही ठिकाणी दुपारनंतर पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. अधूनमधून जोराचा वारा सुरू होता. रत्नागिरीतील मांडवी तसेच अन्य किनाऱ्यांवर दुपारी जोरदार लाटा उसळत होत्या. वादळी वारेही वाहात होते.