वादळाने लांजा तालुक्याला झाेडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:30 AM2021-05-17T04:30:48+5:302021-05-17T04:30:48+5:30
लांजा : चक्रीवादळाचा फटका लांजा तालुक्यालाही बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत़ महामार्गावरील तयार करण्यात आलेल्या ...
लांजा : चक्रीवादळाचा फटका लांजा तालुक्यालाही बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत़ महामार्गावरील तयार करण्यात आलेल्या पर्यायी मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालक यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तर चालत्या रिक्षावर झाड पडल्याने कुवे येथील रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना घडली आहे़
तालुक्यात शनिवारी दुपारी जोरदार वारा व पावसाची रिपरिप सुरू झाली होती. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी काढण्यात आलेल्या पर्यायी मार्गावर माती पसरली हाेती़ रविवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू झाल्याने महामार्गावर चिखल येऊन रस्ता निसरडा बनला होता. तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र कुठेही वित्तीय व मनुष्यहानी झालेली नाही. पालू येथे सात विद्युतखांब तसेच वाडगाव येथे एक वीजखांब जमीनदोस्त झाल्याने या भागातील विद्युतपुरवठा सकाळी १०.३० वाजता खंडित करण्यात आला.
तालुक्यातील आंजणारी येथील गजानन महादेव गुरव, राजाराम शिवराम गुरव-खोरनिनको, चंद्रकांत धकटू गुरव -भांबेड यांच्या घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तर ४ गोठे तसेच तालुक्यातील ३१ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच डाॅ़ मीनल कुष्टे यांच्या घरावरील काैले उडून नुकसान झाले आहे़ पूर्व विभागात वादळाचा फटका बसला. येथील अनेक घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. सध्या पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाचे तलाठी करीत आहेत. तसेच लांजा कोर्ले रोड कुंभारवाडी साळवी इंजिनीअरिंग येथे धावत्या रिक्षावर झाड पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. कुवे येथील गुरव नामक रिक्षाचालक हा जखमी झाला असून, त्याला लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते़