वादळाने मासेमारी व्यवसाय अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:04+5:302021-05-30T04:25:04+5:30
कोरोनाच्या सावटाबरोबरच निसर्गामधील सततच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम या व्यवसायावर चालू हंगामामध्ये सतत जाणवत होता. त्यामुळे मासेमारी व्यवसाय यंदाच्या माेसमात ...
कोरोनाच्या सावटाबरोबरच निसर्गामधील सततच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम या व्यवसायावर चालू हंगामामध्ये सतत जाणवत होता. त्यामुळे मासेमारी व्यवसाय यंदाच्या माेसमात हवा तसा झाला नसल्याने मच्छीमार आर्थिक अडचणीत आले आहेत. चालू मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच वादळामुळे मच्छिमारीला ‘ब्रेक’ मिळाला होता. मासेमारी १ ऑगस्टपासून सुरु होणे आवश्यक असताना ती १५ ते २० दिवस उशिरा सुरु झाल्याने मच्छिमारांना त्याचा मोठा फटका बसला. कारण मासेमारी हंगामाच्या सुरुवातीच्या दिवसात चांगल्या प्रतीचे मासे सापडतात. त्यातून लाखो रुपयांचा व्यवसाय केला जातो. संपूर्ण जिल्ह्यात सुरुवातीच्या मासेमारीच्या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र, यंदाच्या हंगामात मासेमारी व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणी सापडलेला आहे. त्यामुळे यंदा मासेमारी व्यवसायच धोक्यात आला आहे.
सततच्या वातावरणातील बदलाने वर्षातून चार ते पाचवेळा वेगवेगळी वादळे होऊन मासेमारी ठप्प झाली होती. त्यातच काेरोनाचे सावट यामुळे मासेमारी व्यवसायावर दुष्परिणाम झाल्याने मच्छिमारांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला आणि हंगामाच्या सरत्यावेळी तौक्ते वादळानंतर यास वादळाचाही परिणाम जाणवत होता. मात्र, ‘तौक्ते’ने तर धुमाकूळच घातला होता. तौक्तेमुळे सुमारे आठवडाभर मासेमारी ठप्प झालेली असतानाच मासेमारी हंगाम बंद होण्यास आठवडाभराचा कालावधी असतानाच यास वादळामुळेही मासेमारी बंद ठेवावी लागली. त्यामुळे चालू हंगामात मच्छिमारांना वेगवेगळ्या वादळांनी चांगलेच अडचणीत आणले आहे. त्यामुळे पुढील हंगामात खलाशी व नौकांच्या इतर कामासाठी लागणारा खर्च कसा भागवायचा, याची चिंता त्यांना सतावू लागली आहे.