टपाल कार्यालयाचा अजब कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:43+5:302021-07-04T04:21:43+5:30
चिपळूण : शहरातील मार्कंडी येथील टपाल कार्यालयात आजारी मुलाच्या उपचारासाठी पैसे काढायला गेलेल्या नागरिकाला कर्मचारी रजेवर असल्याचे कारण देत ...
चिपळूण : शहरातील मार्कंडी येथील टपाल कार्यालयात आजारी मुलाच्या उपचारासाठी पैसे काढायला गेलेल्या नागरिकाला कर्मचारी रजेवर असल्याचे कारण देत पैसे न देताच वेठीस धरल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. आपलेच पैसे आपल्याच मिळत नसल्याने नाराजी पसरली आहे.
सावकारीचा व्यवसाय तेजीत
आरवली : छत्तीसगड, गुजरात आदी राज्यांमधील धनिकांना हाताशी धरून संगमेश्वर तालुक्यातील अनधिकृत सावकारीचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे़ सावकारीचा संबंध थेट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी असल्याने तक्रारदार, साक्षीदार यांना दमदाटी करून पुरावे नष्ट केले जात असल्याची चर्चा सुरू आहे.
लावणीच्या कामांना वेग
चिपळूण : तालुक्यातील शेतीच्या कामांना वेग आला आहे़ शेतात पेरणी केलेल्या रोपांची योग्य वाढ झाल्याने शेतकरी भात लावणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. शेतात भात लावणीची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाताची पेरणी करण्यात आली होती.
जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट
खेड : तहसीलदार कार्यालय व कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरुवारी अचानक भेटी दिल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती़ दरम्यान, या अचानक भेटी मागचे कारण समजू शकलेले नाही़ ही भेट तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आढावा आणि करावयाच्या उपाययोजनांबाबत होती़.
मोकाट श्वानांचा उपद्रव
रत्नागिरी : शहरातील कोकणनगर, मिरकरवाडा, राजीवडा व अन्य भागांमध्येही गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट श्वानांनी चावा घेण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणेही धोकादायक बनले. वाहनांचाही श्वान पाठलाग करतात. त्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
वाहतुकीची कोंडी
रत्नागिरी : शहरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. परिणामी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून वाहनतळांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.