भरकटलेले मालवाहू जहाज गुहागर समुद्रकिनारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:38 AM2021-09-09T04:38:59+5:302021-09-09T04:38:59+5:30
गुहागर : कोकण एलएनजी प्रकल्पांतर्गत एल अँड टी कंपनी समुद्रामध्ये ब्रेक वॉटर वॉल बांधत आहे. यासाठी एलएनजी प्रकल्पाच्या जेटीशेजारी ...
गुहागर : कोकण एलएनजी प्रकल्पांतर्गत एल अँड टी कंपनी समुद्रामध्ये ब्रेक वॉटर वॉल बांधत आहे. यासाठी एलएनजी प्रकल्पाच्या जेटीशेजारी नांगरून ठेवलेले मालवाहू जहाज जोरदार वारा व पावसामुळे नांगर तुटून गुहागर वरचा पाट मोहल्ला समुद्रकिनारी लागले. आधी या जहाजामुळे शंका आणि संभ्रमाचे वातावरण होते. मात्र ते भरकटून आले असल्याचे समजल्यानंतर ते पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
एलएनजी कंपनीसाठी लिक्विड गॅस घेऊन परदेशातून मोठी जहाजे येतात. पावसाळी हंगामात समुद्र खवळलेला असल्याने लाटांच्या तडाख्यामुळे चार महिने ही जहाजे येऊ शकत नाहीत. यासाठी जेटीसमोरील भागात मोठी ब्रेक वॉटर वॉल बनविण्याचे काम एल अँड टी कंपनी करत आहे. गेले वर्षभर हे काम सुरू असून, पावसाळ्यात बंद करण्यात आले आहे. ब्रेक वॉटर वॉलसाठी लागणारे मोठमोठे दगड समुद्रकिनारी आल्यानंतर मालवाहू जहाजाने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नेले जातात. सध्या हे काम बंद असल्याने मालवाहू जहाज जेटीवरच नांगरून ठेवण्यात आले होते. गेले दोन दिवस जोरदार पाऊस आणि वारा यामुळे लाटांच्या तडाख्याने जहाजाचे नांगर तुटून ते जहाज गुहागर समुद्रकिनारी वरचा पाठ मोहल्ला येथे लागले. याबाबत माहिती समजताच बुधवारी दुपारी तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी पाहणी करून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
जहाजावर कोणीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी झाली नसून, जहाजही सुस्थितीत समुद्रकिनारी लागले आहे. लवकरच हे जहाज येथून काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात येईल, अशी माहिती एल अँड टी कंपनीचे प्रमुख राधाकृष्णन यांनी दिली.