कांगणेवाडीत पथदीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:33 AM2021-04-28T04:33:37+5:302021-04-28T04:33:37+5:30
रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी राजापूर : तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावरील साैंदळ रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर पुराचे पाणी साचून वाहतूक पावसाळ्यात दीर्घकाळ ...
रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी
राजापूर : तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावरील साैंदळ रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर पुराचे पाणी साचून वाहतूक पावसाळ्यात दीर्घकाळ बंद राहते. त्यामुळे साैंदळ येथील त्या खोलगट भागात मातीचा भराव टाकून त्याची उंची वाढविण्याची मागणी प्रवासी, वाहनचालकांमधून होत आहे.
चार्जिंगला बंदी
रत्नागिरी : कोकण रेल्वे मागार्वरून रात्रीच्या वेळी धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील मोबाइल, लॅपटाॅप चार्जिंगसाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत चार्जिंग पोर्टचा वीजपुरवठा बंद असल्याने प्रवाशांना मोबाइल, लॅपटाॅप चार्जिंग करता येणार नाही.
संरक्षक कठडे गायब
आरवली : आरवली- कुचांबे रस्त्यावर मुरडवनजीक पाटबंधारे खात्याने बांधलेल्या कालव्यावरील पुलाला संरक्षक कठडे नाहीत. त्यामुळे हा पूल वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. पाटबंधारे खात्याच्या गडनदी धरणाचा डावा कालवा मुरडव गावातून काढला आहे. या कालव्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.
जलसेवेचे लोकार्पण
खेड : भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून भारतीय जैन संघटनेच्या खेड शाखेतर्फे नगर परिषदेला शीतल जलसेवा प्रदान करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण करण्यात आले. तीनबत्ती नाका येथील हुतात्मा अनंत कान्हेरे पुतळ्याजवळ ही जलसेवा उभारण्यात आली आहे.
अण्णा पाथरे यांची निवड
राजापूर : तालुका अखंड वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अण्णा पाथरे यांची पाचल व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अशोक सक्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत त्यांची निवड करण्यात आली आहे.
आढावा सभा
राजापूर : तालुक्यातील पेंडखळे गावात कोरोना रुग्ण वाढत असल्याने गाव कोरोना हाॅटस्पाॅट बनले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
माळनाक्यावर वृक्षलागवड
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथील साथसाथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ओसाड माळरानावर जंगलाच्या निर्मितीतून ऑक्सिजन देणारी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वड, पिंपळ, जांभूळ, हरडा, बेहडा, चिंच आदी ४०० झाडे लावण्यात आली आहेत. वेळेणेश्वर येथील ओसाड जागेत वृक्षलागवड करण्यात आली.
बेडची मागणी
रत्नागिरी : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दहा टक्के बेड शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, रत्नागिरी शाखेतर्फे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन महासंघाचे अध्यक्ष वामन कदम यांनी दिले आहे.
गाव तेथे क्वारंटाइन सेंटर
राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात गाव तिथे क्वारंटाइन सेंटर उभारण्यात यावे, तसेच जिथे क्वारंटाइन सेंटर तेथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर करावा, अशी मागणी राजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते अविनाश लाड यांनी केले आहे.