मातेच्या परिश्रमाने दिले मुलांच्या पंखांना बळ

By admin | Published: October 6, 2016 11:03 PM2016-10-06T23:03:28+5:302016-10-07T00:17:00+5:30

जयश्री वाडेकर : २९व्या वर्षीच वैधव्याच्या कुऱ्हाडीमुळे खस्ता खात उचलला संसाराचा गाडा--सलाम

Strengthen the children's wings with the hard work of mother | मातेच्या परिश्रमाने दिले मुलांच्या पंखांना बळ

मातेच्या परिश्रमाने दिले मुलांच्या पंखांना बळ

Next

शोभना कांबळे -- रत्नागिरी -केवळ दहा वर्षांचा संसार मोडला. अवघ्या २९व्या वर्षीच वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. तीन अजाण मुलांना पदरात टाकून पती कायमस्वरूपी प्रवासाला निघून गेला. मात्र, परिस्थितीने डगमगून न जाता दहा घरची धुणी-भांडी करून जयश्री अरूण वाडेकर यांनी आपल्या मुलांना केवळ वाढविले नाही तर त्यांनाही स्वकमाईवर शिक्षण करण्यास उद्युक्त केले. आईच्या ललाटावर नियतीने कष्ट लिहिले असले तरी त्या पाऊलवाटेवरून जात मुलांनीही आपले आयुष्य उजळवले, एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही कथा.
रत्नागिरीनजीकच्या नारायणमळी येथील अरूण वाडेकर यांच्याशी जयश्री वाडेकर यांचे १९व्या वर्षी लग्न झाले. लग्नापासूनच त्यांच्या कष्टाला सुरूवात झाली होती. पती व्यसनाधीन झाल्याने संसाराला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली. त्यातच तीन मुले पदरात. अखेर व्यसनाने पती हिरावून घेतला आणि जयश्री वाडेकर तीन लहानग्यांसह एकाकी पडल्या. त्यावेळी मोठी मुलगी जागृती दुसरीत शिकत होती. दोन नंबरचा अनिल चार वर्षांचा आणि लहानगा सुनील केवळ दोन वर्षांचा. काही दिवस सासुबाई सोबत होत्या. पण, नंतर त्याही निघून गेल्या. कुणाचाही आधार नाही. कसा करणार उदरनिर्वाह? मुलांची काळजी जयश्री वाडेकर यांना छळू लागली. काहीही झालं तरी मुलांना मोठं करायचं, त्यांना शिकवायचं, असा निर्धार त्यांनी केला. पती निधनाचे दु:ख बाजुला सारून त्यांनी कंबर बांधली आणि रत्नागिरी शहरात येऊन धुणीभांडी करण्यास सुरुवात केली. हळूहळू घरकामे मिळू लागली. दहा घरची कामे करताना त्यांचा अख्खा दिवस जायचा. सकाळी ९ वाजता दोन्ही वेळचे जेवण करून ठेवावे लागे. लहानग्यांना घरी सोडून येताना त्यांचा जीव कासावीस व्हायचा. घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे आठ वाजायचे. रात्री घरी गेल्यानंतर मुलांना कुशीत घेताना दिवसभराचा सारा शिणवटा निघून जायचा. हळूहळू घरकामांमधून चार पैसे हातात येऊ लागले, मुले शाळेत जाऊ लागली. आईच्या कष्टाच्या पाऊलवाटेवरून जात मुलांचे शिक्षण सुरू झाले. मोठी मुलगी बारावी झाली. दहावीनंतर तिने रत्नागिरीतील वाचनालयात, तर बारावीनंतर टेलिफोन कार्यालयात काम करण्यास सुरूवात केली. त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यात तिचे पुढचे शिक्षण सुरू झाले. पदवीधर झाल्यानंतर जयश्री वाडेकर यांनी तिचा विवाह करून दिला. तिच्याही कष्टाचे चीज झाले. सध्या ती कोर्टात नोकरी करीत आहे.
दोन नंबरचा अनिल बारावी झाला आणि त्याने रत्नागिरीतील एका मेडिकल स्टोअर्समध्ये काम करून शिक्षण घेण्यास सुरूवात केली. स्वकमाईवर त्याने ‘बी. एम. एस.’ केले. आज तो एका नामांकित कंपनीचा ‘रिप्रेझेंटेटिव्ह’ म्हणून काम करीत आहे.
धाकटा सुनील बारावीनंतर छोटी-मोठी कामे करत आता बाहेरून परीक्षा देत पदवीधर झाला आहे. तो आता मार्केटिंगच्या क्षेत्रात काम करीत आहे. आयुष्यभर कष्ट करून जयश्री वाडेकर आता थकल्या असल्या तरी ज्या कामांवर आपण मुलांचे जीवन घडविले, ती कामे सोडू नयेत, असे त्यांना मनापासून वाटते. पण, आता थकलेले शरीरही साथ देत नाही. त्यामुळे आजारपणाचा सामना करावा लागत आहे. त्यातच त्यांच्या तीनही मुलांना आता आपल्या आईने यापुढे तरी कष्ट करू नयेत, असे वाटतेय. त्यामुळे सध्या त्यांनी आपली कामे थांबवली आहेत. पूर्वी एकच छोटीशी खोली असलेल्या सामायिक घराची आता वाटणी झाल्याने जयश्री वाडेकर यांची मुले आता स्वकष्टाच्या कमाईतून घराचे स्वप्न पूर्ण करीत आहेत. त्याच्या पूर्ततेसाठी सध्या त्या आपला सर्व वेळ खर्च करीत आहेत.



मुलांची साथ मोलाची
आईचे कष्ट पाहून लहानपणापासूनच मुलांच्या अंगी काटकसर बाणली गेली. कधीकधी अनवाणी शाळेत जाण्याचीही वेळ या मुलांवर आली. शाळेचा एकच गणवेश असल्याने रात्री तो धुवून चुलीवर वाळवून दुसऱ्या दिवशी तो घालून ही मुले शाळेत जायची. जुन्या शाळेच्या वस्तू, पुस्तके, दप्तरे वापरताना या मुलांनी कधीच कुरकूर केली नाही.


लहानपणापासूनच कष्ट
जयश्री वाडेकर यांच्या मुलांनी लहानपणापासूनच शिक्षणासाठी कष्ट करण्यास सुरूवात केली. अनिल याने तर सातवीनंतर बागकाम करण्यास सुरूवात केली. मेडिकल स्टोअर्समध्ये काम करत असताना त्याला एका कनवाळू बार्इंनी जुनी सायकल दिली. ती घेऊन तो रात्री-अपरात्री घरी जायचा. पण त्याने जिद्दीने बी. एम. एस.चे शिक्षण पूर्ण केले.

Web Title: Strengthen the children's wings with the hard work of mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.