वाढत्या रुग्णसंख्येने रत्नागिरीवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:38 AM2021-06-09T04:38:49+5:302021-06-09T04:38:49+5:30
रत्नागिरी : जून महिना सुरू झाला तरीही कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणाखाली आलेली नाही. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रत्नागिरीतील दोन्ही कोविड रुग्णालये, ...
रत्नागिरी : जून महिना सुरू झाला तरीही कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणाखाली आलेली नाही. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रत्नागिरीतील दोन्ही कोविड रुग्णालये, डीसीएचसी आणि कोरोना सेंटर यावर अधिक ताण येत असल्याने रुग्णांना खाटा मिळणे जिकिरीचे झाले आहे.
जिल्ह्यात आता दरदिवशीच कोरोना रुग्णांची संख्या ५०० ते ६०० वर पोहोचू लागली आहे. त्यातच आता शासनाने सौम्य लक्षणे किंवा अजिबातच लक्षणे नसलेल्या आणि ज्यांच्या घरी स्वतंत्र अलगीकरणाची सोय आहे, अशा १० ते २० टक्के कोरोना रुग्णांना घरी उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी स्वतंत्र सोय आहे, अशा रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे असे रुग्णही आता अन्य तालुक्यांमध्ये कोरोना केअर सेंटर पुरेशा प्रमाणात नसल्याने तसेच तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रत्नागिरी शहरातील केअर सेंटरमध्ये दाखल होत आहेत.
रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने आणि रत्नागिरीतच महिला रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालय अशी दोन कोविड रुग्णालये आहेत. त्यामुळे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड तसेच अन्य उपचार गंभीर रुग्णांना या दोन रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. या सुविधा कामथे, कळंबणी, दापोली या उपजिल्हा रुग्णालयात काही प्रमाणात असल्या, तरी तज्ज्ञ डाॅक्टर्स रत्नागिरीतच आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी हलविले जात आहे. त्यामुळे या दोन्ही कोविड रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. सध्या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेने तज्ज्ञ डाॅक्टर्स आणि अन्य कर्मचारी यांची संख्या अपुरी असल्याने आरोग्य यंत्रणेचीही दमछाक होत आहे.
दरदिवशी येणाऱ्या पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये कुटुंबातील एकाबरोबरच अनेक सदस्य बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे अशांना एकत्र ठेवण्यासाठी आता केअर सेंटरमध्ये क्षमता अपुरी पडू लागली आहे.
रुग्णसंख्या वाढू लागली असली, तरी अजूनही केअर सेंटरमध्ये आणखी वाढ न झाल्याने आहे त्याच केअर सेंटरमध्ये सर्वच खाटा भरलेल्या राहात आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांना या केअर सेंटरमध्येही जागा मिळताना अडचणी येत आहेत.
चौकट
शासनाच्या नव्या निर्णयानुसार, ज्या ग्रामपंचायतींमध्ये २००० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे, त्या ग्रामपंचायतींनी गावातील सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांसाठी अलगीकरण कक्ष सुरू करावयाचे आहेत. मात्र, ते सुरू करतानाही बाधितांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. मात्र, या रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यास त्यांना तालुक्याच्या डीसीएचसी किंवा रत्नागिरीतील कोरोना रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागणार आहे. सध्या काही ग्रामपंचायतींकडून याची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, सध्या कोरोना रुग्णसंख्या अजूनही भरमसाठ वाढत असल्याने रत्नागिरीतील कोरोना रुग्णालय तसेच कोविड सेंटरवर अधिक ताण येत आहे.