रत्नागिरीत कॉपी रोखण्यासाठी कडक तपासणी, दहावी परीक्षा केंद्रांवर पालकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:40 AM2019-03-02T11:40:09+5:302019-03-02T11:41:36+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला दि. १ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागातून ३५ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिला पेपर मराठी भाषेचा होता. विद्यार्थ्यांपेक्षा अधिक घालमेल पालकांचीच होत असल्याचे दिसून येत होते.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला दि. १ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागातून ३५ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिला पेपर मराठी भाषेचा होता. विद्यार्थ्यांपेक्षा अधिक घालमेल पालकांचीच होत असल्याचे दिसून येत होते.
परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये व कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, यासाठी परीक्षा केंद्राच्या आवाराबाहेर विद्यार्थ्यांच्या सॅक, बॅग्ज् ठेवण्यात आल्या होत्या. पारदर्शक पॅड, कंपास बॉक्स, रिसीट तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वर्गात सोडण्यात येत होते.
परीक्षा केंद्रावर सकाळपासूनच लगबग सुरू होती. ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आली आहेत, त्या शाळांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. नियमित वेळेत बदल करून दुपारच्या सत्रात या शाळा भरविण्यात येणार आहेत.
कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथके तैनात असून, एका महिला विशेष भरारी पथकाचाही समावेश करण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी प्रथमच कृतिपत्रिका पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे.
दहावीच्या परीक्षा दि. २२ मार्चला संपणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ४०३ शाळांमधील २३,८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२५ शाळांमधील ११,४५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील ६२८ शाळांमधून ३५ हजार ३०७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
कोकण विभागात ११४ केंद्र असून, यातील रत्नागिरीमध्ये ७३, तर सिंधुदुर्गमध्ये ४१ केंद्र आहेत. २२ परीरक्षक केंद्र असून, यामध्ये रत्नागिरीमध्ये १३ केंद्र, तर सिंधुदुर्गमध्ये ९ परीरक्षक केंद्र आहेत. हजेरी पूर्ण न भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठी प्रवेशच रद्द करण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील ५८ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. कोकण विभागातील ३५९ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांना मान्यता देऊन त्यांना लेखनिक उपलब्ध करण्याची सुविधा देण्यात आली आहे.