काटेकोर अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:30 AM2021-05-16T04:30:39+5:302021-05-16T04:30:39+5:30
रत्नागिरी : शहराजवळील ग्रामपंचायत खेडशी येथे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. आतापर्यंत ७७७ घरांतील ...
रत्नागिरी : शहराजवळील ग्रामपंचायत खेडशी येथे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. आतापर्यंत ७७७ घरांतील २९१७ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यात १३ जण कोरोनाबाधित सापडले आहेत. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी
खेड : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यातील धनगरवाड्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई ग्रामस्थांना जाणवायला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील वावेतर्फे नातू गावातील धनगरवाडीला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. धनगरवाड्यांना शासकीय वाहनांने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भडकंबा ग्रामपंचायत क्षेत्रात मोहीम
साखरपा : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केलेल्या ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा प्रारंभ भडकंबा ग्रामपंचायत क्षेत्रातील बेर्डेवाडीतून नुकताच करण्यात आला. येथील ग्रामस्थांच्या शरीरामधील ऑक्सिजनची पातळी आणि तापमान तपासण्यात येत आहे.
डांबरीकरण कामाचा प्रारंभ
खेड : तालुक्यातील सवेणी बौध्दवाडी येथे स्मशानभूमी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ पदाधिकारी युवराज गुजर यांच्या हस्ते झाला. तर सवेणी येथील बौध्द समाजाचे अध्यक्ष भाई पवार, उपाध्यक्ष प्रकाश पवार, प्रभाकर पवार, अनिल पवार व अन्य उपस्थित होते.
रस्त्याच्या दुतर्फा झाडे बहरली
पावस : रत्नागिरी तालुक्यातील कसोप-फणसापे ते पावस या मार्गाच्या दुतर्फा श्री चॅरिटेबल ट्रस्टने लावलेली झाडे कडक उन्हातदेखील बहरली आहेत. स्वरुपसावळी उपक्रमांतर्गत या रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ, करंज, बहावा, सप्तपर्णी, जांभूळ, सोनमोहोर आदी प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.
गावात ‘जनता कर्फ्यू’
पाली : ग्राम कृतीदलाच्या निर्णयानुसार नाणीज पंचक्रोशीत ‘जनता कर्फ्यू’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन पुढील जनता कर्फ्यूबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
घरोघरी आरोग्यविषयक तपासणी
रत्नागिरी : कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाची वाढती साखळी रोखण्यासाठी पावस पंचक्राेशीत घरोघरी जाऊन आरोग्यविषयक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असलेल्या ग्रामस्थांना उपचारासाठी तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले जात आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
चिपळूण : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी अलिकडच्या काही दिवसांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब दिलासादायक आहे. मात्र, दरदिवशी उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
विद्युतखांबांचा धोका
राजापूर : तालुक्यातील उपळे परिसरातील गंजलेले विद्युत खांब, लोंबकळत असलेल्या विद्युत तारा, वाटेमध्ये व घरांना अडथळे ठरत असलेले विद्युत खांब बदलण्याची मागणी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
इंटरनेट सेवेचा खेळखंडोबा
आवाशी : रत्नागिरी जिल्ह्यात भारत दूरसंचार निगम लि. सेवेतील मोबाईल व इंटरनेट सेवेचा पुरता खेळखंडोबा सुरू आहे. ही सुविधा मिळत नसल्यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. खेड तालुक्यात गेले दोन दिवस बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंद आहे.