पंधरा दिवस लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करणार : लक्ष्मीनारायण मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:30 AM2021-04-15T04:30:32+5:302021-04-15T04:30:32+5:30
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे त्याला थोपविण्यासाठी कडक लाॅकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून ...
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे त्याला थोपविण्यासाठी कडक लाॅकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पंधरा दिवस लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या काळात सर्व प्रकारचे उद्योग, उत्पादन करणारे कारखाने, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, बार, शाॅपिंग माॅल, सिनेमागृह, प्रार्थनागृहे, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आदी सर्व कार्यक्रम, शैक्षणिक संस्था, खासगी क्लासेस, स्पा, सलून आदी सर्व व्यवसाय बंद राहणार असून, पावसाळापूर्व कामांना सुरू ठेवण्यास मुभा दिली जाणार आहे. नागरिकांना सर्व सुविधा केवळ घरपोच सेवेद्वारे मिळणार आहेत. विना ओळखपत्र विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, त्यांची अँटिजन चाचणीही होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बुधवारी झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे आता शासनाच्या नियमावलीचे काटेकाेरपणे पालन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माहिती देण्यासाठी मिश्रा यांनी ही पत्रकार परिषद घेतली. या नियमावलीनुसार, गुरुवारपासून सकाळी ७ ते रात्रीपर्यंतच महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडता येणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांच्यावर परिवहन कार्यालयाकडून कारवाई केली जाणार, तसेच त्यांची अँटिजन चाचणीही करण्यात येणार. बँक, आरोग्य, बांधकाम विभाग, शासकीय कार्यालये, अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्यांनाही त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे.
धान्य, कडधान्ये, खाद्यपदार्थ, भाज्या आदी जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. घरपोच सेवा देणाऱ्यांना ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. पेट्रोल पंपावरही अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच पेट्रोल देण्याची परवानगी राहील. उद्योग सुरू ठेवणाऱ्यांना ५००, १००० ते १०००० पर्यंत दंड करण्यात येईल. मालवाहतुकीला परवानगी राहील.
पुढील काळात मुंबईकर मोठ्या प्रमाणावर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने चेकनाके पुन्हा उभारण्यात येणार असून, प्रत्येक नाक्यावर सर्व वाहने तपासली जाणार आहेत. रेल्वेस्थानके, तसेच बसस्थानकांवर बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून पाॅझिटिव्ह येणाऱ्यांना अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
या काळात शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती सक्तीची करण्यात येणार आहे. ५० टक्क्यांपेक्षा एकही कर्मचारी अधिक असता कामा नये, तसेच अभ्यागतांनाही प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व कार्यालयीन व्यवहार मेल, फोन तसेच काॅलसेंटरद्वारे सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.
सध्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने कडक लाॅकडाऊनचे पाऊल उचलावे लागत आहे. त्यामुळे यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
चौकट
सध्या कोरोनाबाधितांमध्ये ६० टक्के लोक लक्षणेविरहित असून, यात ४५ वर्षांच्या आतील असणाऱ्यांची टक्केवारी ८० आहे. हे लोक बाहेर फिरत असल्याने इतरांना बाधित करतात. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेसाठी लसीकरण आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी चाचणी करून घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
कोरोनाच्या अनुषंगाने डीसीएचसी, सीसीसी, तसेच खासगी रुग्णालयांमधूनही आता कोरोना उपचार सुरू आहेत. सर्व सीसीसींमध्ये १६०० खाटांची क्षमता असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.
चौकट
रत्नागिरी, खेड, चिपळूण या ठिकाणी मोबाइल टेस्टिंग सेंटर सुरू करण्यात आले आहेत. रुग्णवाहिकाही पुरेशा असून, आवश्यक त्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. रेमडेसिविर, ऑक्सिजनचाही पुरवठा सध्या मुबलक प्रमाणात आहे. खासगी डाॅक्टर्सही आता उपचारासाठी उपलब्ध होत असून, यात जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
चौकट
यावर्षीही हेल्पिंग हँडस्कडून मदतीसाठी प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर लाॅकडाऊन काळात गेल्या वर्षीसारखे प्राथमिक शिक्षकांना आराेग्य मित्र, पोलीस मित्र म्हणून आवाहन करण्यात येणार आहे.