गरज पडल्यास रत्नागिरीतही कडक लाॅकडाऊन करणार : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:20+5:302021-05-09T04:33:20+5:30
रत्नागिरी : काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे राेजी रात्री १२ पासून कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात ...
रत्नागिरी : काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे राेजी रात्री १२ पासून कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़. सिंधुदुर्गप्रमाणे गरज पडल्यास रत्नागिरी जिल्ह्यातही कडक लाॅकडाऊन करण्यात येईल़. याबाबत पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून येत्या दाेन दिवसांत निर्णय घाेषित करू, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़
ऑनलाईन घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सिंधुदुर्गात कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे़. या लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, आंबा वाहतूक, लसीकरण व अन्य महत्त्वाच्या बाबींसाठी सूट देण्यात येणार आहे़. अन्य सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले़. रत्नागिरीतही काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने कडक लाॅकडाऊन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले़
कोरोनाची तिसरी लाट येणार असून, त्यामध्ये लहान मुले बाधित होण्याचा धोका आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी विशेष काळजी घेत लहान मुलांसाठी अद्ययावत काेविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मुलांवर चांगले उपचार व्हावेत, यासाठी तज्ज्ञ बालरोगतज्ज्ञांची टीमही नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे खास महिलांसाठी स्वतंत्र शंभर बेडचे कोरोना रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची कमतरता भासत असल्याने रुग्णांना खुर्चीत किंवा बाकड्यावर झोपून उपचार द्यावे लागत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, याबाबत आपण वस्तुस्थितीची माहिती घेताे, असे सांगितले. पत्रकारांना कोरोना लस उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगून, लस उपलब्ध झाल्यानंतर जनतेसाठी लसीकरण करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.