संगमेश्वर तालुक्यात कडकडीत लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:32 AM2021-04-16T04:32:00+5:302021-04-16T04:32:00+5:30
देवरुख : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यामधून गुरुवारी लॉकडाऊनला ...
देवरुख : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यामधून गुरुवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील बाजारपेठांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने दिवसभर सर्वत्र शुकशुकाट हाेता.
साखरपा, माखजन, आरवली, संगमेश्वर या बाजारपेठांमध्येही कडक लॉकडाऊन पाळण्यात आले होते. साखरपा परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा बुधवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी कोंडगाव-साखरपा बाजारपेठेतील बहुसंख्य व्यापाऱ्यांनी लस घेतली. तर काहींनी स्वत:हून आटीपीसीआर चाचणीही करून घेतली.
नेहमी गजबजलेला असणारा देवरुख एस. टी. स्टँडच्या परिसरात शुकशुकाट होता. लॉकडाऊनच्या भीतीने मंगळवार व बुधवारी संगमेश्वर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. या गर्दीनंतर गुरुवारी नागरिकांनी लॉकडाऊनला एक प्रकारे पाठिंबा दिला. संगमेश्वर नाक्यामध्ये पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याबरोबरच साडवली सह्याद्रीनगर, मार्लेश्वर तिठा या ठिकाणी देवरुखचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता.
..............................
सह्याद्रीनगर येथे फिरणाऱ्या तिघांची चौकशी करण्यात आली. हे तिघे जण कामाशिवाय फिरत असल्याची खात्री होताच देवरुख पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. देवरुखमध्ये गुरुवारी सगळे रिक्षा स्टँड रिकामे हाेते. एकही रिक्षा तालुक्यात फिरली नाही.
.............................
कॅप्शन : संगमेश्वर बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला हाेता.