काेरोनाची साखळी तोडण्यासाठी सावर्डेत कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:55+5:302021-05-08T04:33:55+5:30
चिपळूण : चिपळुणात नागरिकांची गर्दी अजूनही कमी हाेत नसतनाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सावर्डे गावाने कडक लॉकडाऊन पाळला आहे. गेल्या ...
चिपळूण : चिपळुणात नागरिकांची गर्दी अजूनही कमी हाेत नसतनाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सावर्डे गावाने कडक लॉकडाऊन पाळला आहे. गेल्या चार दिवसांपासून मेडिकल व दवाखानेवगळता काहीच सुरू नाही. भाजीपाला आणि किराणा दुकानेही बंद ठेवून सर्वच घटकांनी कडक लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केला. शहरासह ग्रामीण भागातही त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, चिपळूण शहरातील गर्दी नियंत्रणात येताना दिसत नाही. मध्यतरी काही दिवस भाजीपाला व्यवसाय बंद होता. तो आता जोमाने सुरू झाला आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. दुसरीकडे सावर्डे गावही ५ हजारावर लोकसंख्या असल्याने येथे चिपळूण शहराप्रमाणेच निर्बंध लागू होते. मात्र, गावातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय गावाने घेतला. त्यासाठी व्यापारी, ग्रामकृती दल, ग्रामपंचायत अशी संयुक्त बैठक झाली. त्यानुसार ३ ते १० मेपर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार केवळ मेडिकल व दवाखानेच सुरू आहे. अत्यावश्यक सेवेतील किराण दुकान, मटण व मच्छीविक्रेते, भाजीपाला, दूध, बेकरी आदी सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे
रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.
सावर्डेत एप्रिल महिन्यात दररोज १३ ते १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. आता ही संख्या ५ ते ६ वर आली आहे. गावात कडक लॉकडाऊन झाल्याने खऱ्याअर्थाने कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होत आहे. तुलनेत तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चिपळूण शहर व खेर्डी येथे मात्र सावर्डेसारखी स्थिती नाही. चिपळूण शहर, खेर्डी व सावर्डे ही तिन्ही गावे लोकसंख्येने मोठी आहेत. या गावांमध्ये परिसरातील लोकसही खरेदीसाठी येत असल्याचे त्याचे पडसाद त्या-त्या गावांत उमटत असतात. त्यामुळे किमान शहरात सावर्डेसारखा कडक लॉकडाऊन हवा, अशी मागणी होत आहे.