खेर्डीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे गावात कडक निर्बंध लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:29 AM2021-05-01T04:29:46+5:302021-05-01T04:29:46+5:30

चिपळूण : खेर्डीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे गावात कडक निर्बंध लागू करण्याचे ठरविण्यात आले आहे. गावात १२० हून अधिक बाधित ...

Strict restrictions apply to the village due to the increasing corona infection in Kherdi | खेर्डीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे गावात कडक निर्बंध लागू

खेर्डीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे गावात कडक निर्बंध लागू

Next

चिपळूण : खेर्डीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे गावात कडक निर्बंध लागू करण्याचे ठरविण्यात आले आहे. गावात १२० हून अधिक बाधित रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची अ‍ॅण्टिजेन टेस्ट केली जाईल. चाचणीत पॉझिटिव्ह आल्यास पेढांबे क्वारंटाइन सेंटरमध्ये त्याची रवानगी होईल. गावात अत्यावश्यक सेवेतील मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यवसाय, दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत झाला.

खेर्डी परिसरातील कोरोना संसर्गाची वाढती परिस्थिती लक्षात घेत प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. मुळात जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार खेर्डीतील लोकसंख्या ५ हजारांच्यावर असल्याने मेडिकल व दवाखाने याव्यतिरिक्त सर्व दुकाने बंद ठेवणे गरजेचे होते. मात्र, काही ठिकाणी या नियमाला हरताळ फासला जात होता. त्यामुळे खेर्डीतील जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, सरपंच वृंदा दाते, उपसरपंच विजय शिर्के, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सहायक, तलाठी, कृषी अधिकारी, पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली.

खेर्डीतील बाजारपेठेसह गावात होणाऱ्या गर्दीवरून चर्चा झाली. कंपनीने कामगारांची कोविड टेस्ट करण्याची सूचना करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे ठरले. किराणा दुकानदारांना घरपोच सेवा देण्याची सूचना करण्यात आली आहे. जे व्यापारी, दुकानदार नियमांचा भंग करतील, त्यांच्यावर थेट कारवाईचा इशारा देण्यात आला.

...............................

मोठ्या दुकानदारांना अभय

गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी कडक लॉकडाऊन करण्याचे ठरले. मात्र, काही वजनदार व्यावसायिक शासकीय नियमांना केराची टोपली दाखवत आहेत. त्यामुळे प्रशासनाने सर्वांनाच समान न्याय द्यावा. छोटी दुकाने बंद ठेवून मोठ्यांना अभय देऊ नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Strict restrictions apply to the village due to the increasing corona infection in Kherdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.