रत्नागिरीत कडक बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:46+5:302021-04-22T04:32:46+5:30

रत्नागिरी : कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाच मृत्यूचा आकडाही वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत ...

Strict security in Ratnagiri | रत्नागिरीत कडक बंदोबस्त

रत्नागिरीत कडक बंदोबस्त

Next

रत्नागिरी : कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाच मृत्यूचा आकडाही वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने लॉकडाऊन करण्यात आलेले असतानाही लोक फिरताना दिसत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी कडक पोलीस बंदाेबस्त करण्यात आला आहे.

रुग्णांच्या संख्येत वाढ

देवरुख : दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने सर्वत्र पसरू लागला आहे. शहरासह आता ग्रामीण भागातही संसर्ग वाढू लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. यानंतरही उन्हाळी हंगामात मुुंबईकर गावाला दाखल होणार असल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिकच भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रिलीफ फाउंडेशन पुढे सरसावले

चिपळूण : लॉकडाऊन कालावधीत हातावर पोट असलेल्या गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी रिलीफ फाउंडेशन पुन्हा सरसावले आहे. शहरासह तालुक्यातील १५० कुटुंबीयांना महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार असून, या प्रक्रियेस नुकताच प्रारंभ झाला आहे.

टँकर सुरू झाल्याने समाधान

खेड : तालुक्यातील खोपी रामजीवाडी येथे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. टँकरसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर पाण्याचा टँकर सुरू झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

नगरपंचायतीला पीपीई कीट वाटप

मंडणगड : मंडणगड तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन माजी आमदार संजय कदम यांच्यातर्फे येथील नगरपंचायतीला पीपीई कीट तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. येथील रिक्षा संघटनेलाही मास्कचे वाटप करण्यात आले. कदम यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील शाळांना ६,५०० मास्क देण्यात आले.

महागाईमुळे गरिबांचे हाल

राजापूर : वर्षभरापासून कोरोनाच्या संकटात अडकलेल्या जनतेच्या हातातील काम हिरावले गेले आहे. त्यातच आता महागाईने डोके वर काढले आहे. मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर उत्तरोत्तर वाढू लागले आहेत. या महिन्यात खाद्यतेलाच्या दरात २५ ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे.

रिक्षा व्यावसायिक मेटाकुटीला

राजापूर : लॉकडाऊनचा फटका विविध व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. गेल्या वर्षापासून रिक्षा व्यावसायिकांनाही लॉकडाऊनमुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. बँकांच्या कर्जाचे हप्ते भरताना हे व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. त्याचबरोबर शासनाने विमा, परमिट, पासिंगसह अन्य शुल्कात वाढ केल्याने हे व्यावसायिक हतबल झाले आहेत.

आर्थिक नुकसान

खेड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसत आहे. उत्पादन थांबल्याने हैराण झालेल्या उद्योजकांना आता पुन्हा या लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. उद्योग बंद असला तरी कामगारांचे वेतन द्यावे लागणार असल्याने हा सगळा खर्च कसा करायचा ही विवंचना सतावत आहे.

Web Title: Strict security in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.