दापाेलीत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:59+5:302021-06-04T04:23:59+5:30
दापोली : तालुक्यात ‘मिशन ब्रेक द चेन’ची अंमलबजावणी सुरू असून, महसूल नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ...
दापोली : तालुक्यात ‘मिशन ब्रेक द चेन’ची अंमलबजावणी सुरू असून, महसूल नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गुरुवारपासून जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत, परंतु, पेरणीचा हंगाम लक्षात घेता कृषी सेवा केंद्र व मेडिकल, दवाखाने सुरू ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कडक लाॅकडाऊन असला तरीही अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्या आहेत. दापोली शहरातील लोकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली असून कोणीही दुकाने उघडली नाहीत. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. तसेच रस्तेसुद्धा निर्मनुष्य झाले होते. बंदच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसला.
दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी शहरात फेरफटका मारून शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला़