लांजात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:31+5:302021-06-04T04:24:31+5:30
लांजा : कडक लाॅकडाऊनसाठी गुरुवारी सकाळपासून लांजात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने ...
लांजा : कडक लाॅकडाऊनसाठी गुरुवारी सकाळपासून लांजात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने तसेच विनाकारण फिरण्यास बंदी असल्याने शहर, ग्रामीण भागासह महामार्गावरही पूर्ण शुकशुकाट होता.
चालू वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली होती. एप्रिल व मे महिन्यात रुग्ण झपाट्याने वाढले. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने चिंता वाढली आहे. गेल्या दीड महिन्यामध्ये लाॅकडाऊन करूनही कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी यांनी सध्या सात दिवसाचे कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे.
लांजा तालुक्यात गेल्या वर्षभरात कोरोना रुग्णसंख्या पाहता या दोन महिन्यातील कोरोना रुग्णसंख्या तिपटीने वाढलेली आहे. गेल्या वर्षभरात कालावधीत सर्वसाधारण २० वृद्धांचा कोरोनाने मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन महिन्यामध्ये मृत्यूचे प्रमाण चारपटीने वाढले असून, यात तरुणांची संख्या अधिक असल्याने चिंता वाढली आहे.
पोलिसांनी कोर्ले फाटा येथे सकाळपासून नाकाबंदी केल्याने बाजारपेठेत कुणालाही प्रवेश मिळाला नाही. शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचीही पोलीस चौकशी करीत होते. गुरुवारी ग्रामीण भागातही पूर्णपणे शुकशुकाट होता.