काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हाबंदीची काटेकाेर अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:34 AM2021-05-08T04:34:02+5:302021-05-08T04:34:02+5:30
राजापूर : तालुक्यात प्रस्तावित असलेले ओणी येथील कोविड रूग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे, लसीकरणाबाबत तालुक्यात सुयोग्य असे नियोजन करावे़ ...
राजापूर : तालुक्यात प्रस्तावित असलेले ओणी येथील कोविड रूग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे, लसीकरणाबाबत तालुक्यात सुयोग्य असे नियोजन करावे़ तालुक्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाबंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी जाेरदार मागणी शुक्रवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांच्याकडे केली.
पुढील आठवडाभरात ओणी येथील कोविड रूग्णालय सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत़ लसीकरणाबाबत नियोजन करून पात्र लाभार्थींना तातडीने दुसरा डोस देण्याबाबत कार्यवाही करताना ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने केले जावे याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार राजन साळवी यांनी दिली.
राजापूर तालुक्यातील वाढता कोरोना संसर्ग, लसीकरणाबाबत सुरू असलेल्या तक्रारी याबाबत आढावा घेण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी शासकीय विश्रामगृहावर संवाद साधला. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेली जिल्हाबंदी कागदावरच असल्याचे सांगितले़ स्थानिक व्यापारी, चिरेव्यावसायिक, कामगार यांना बंदी आणि परजिल्ह्यातील येणाऱ्यांना राजरोसपणे सोडले जाते़ ऑनलाईन नोंदणीत तालुक्यालाच प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली़
राजापूर तालुक्यात कोविड रूग्णालय कधी सुरू होणार, आणखी किती बळी गेल्यावर हे कोविड रूग्णालय सुरू होणार असा प्रश्न भाजप तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी उपस्थित केला. ग्रामीण भागात कोरोना तपासणी, लसीकरणासाठी लोकांना आणण्यासाठी ५० रिक्षा व्यावसायिकांचे लसीकरण करून त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी गुरव यांनी केली. काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर यांनी रायपाटण कोविड सेंटरमधील गैरसोयींचा पाढा वाचला़ व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर व दीनानाथ कोळवणकर यांनी व्यापाऱ्यांचे व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी केली. आरोग्य विभागातर्फे एम. ए. जाधव व अमित नवरे यांनी लसीकरण व अन्य कामाबाबत माहिती दिली़ अॅड. हुस्नबानू खलिफे, अॅड. जमीर खलिफे यांनी लसीकरणाबाबत योग्य पद्धतीने नियोजन झाले पाहिजे, अशी मागणी केली.
राजापूर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांनी पत्रकारांचा फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समावेश करावा आणि त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी केली. तर पत्रकार महेश शिवलकर, राजेंद्र बाईत, विनोद पवार, शरद पळसुले देसाई यांनीही तालुक्यातील लसीकरण व कोरोनाच्या अन्य प्रश्नांवर लक्ष वेधले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शिवसेना शहर प्रमुख संजय पवार, उमेश कोळवणकर, अरविंद लांजेकर, राजन कुवळेकर उपस्थित होते.
आमदार राजन साळवी यांनी ओणी येथील कोविड रूग्णालयासाठी आवश्यक ते सामान आले असून, ऑक्सिजन पाईपलाईन यंत्रणेचे काम प्रलंबित आहे़ ते पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पुढील आठवडाभरात हे रूग्णालय सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.