शेवटच्या सभेत जोरदार राजकारण

By admin | Published: December 22, 2016 12:29 AM2016-12-22T00:29:29+5:302016-12-22T00:29:29+5:30

रत्नागिरी नगरपरिषद : दोन नगरसेवक फुटल्याने शिवसेनेचा नैतिक पराभव

Strong politics in the last meeting | शेवटच्या सभेत जोरदार राजकारण

शेवटच्या सभेत जोरदार राजकारण

Next

रत्नागिरी : ट्रक टर्मिनससाठीच्या विरोधाबाबत पक्षादेश बजावण्याची वेळ आलेल्या शिवसेनेला रत्नागिरी नगर परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीच्या शेवटच्या सभेत नैतिक पराभव स्वीकारावा लागला. वर्तमानपत्रातून पक्षादेश बजावूनही शिवसेनेचे दोन सदस्य फुटल्याने टर्मिनसचा ठराव मंजूर झाल्याने शिवसेनेचा पराभव झाला. शेवटच्या सभेत भाजप आणि राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशा राजकारणाने कळस गाठल्याचे चित्र नगरपरिषदेत दिसत होते.
नगराध्यक्ष पदाबाबत भाजपने शब्द न पाळल्यामुळे शिवसेनेने बऱ्याच विषयांमध्ये भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. संख्याबळ मोठे असल्यामुळे त्यात शिवसेनेला यशही आले. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवक विनय तथा भय्या मलुष्टे यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली. त्यांच्या पत्नीने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. तेव्हापासून ते राष्ट्रवादीसोबतच आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक उमेश शेट्ये यांच्या पत्नी उज्ज्वला शेट्ये शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. मात्र त्यांनीही शिवसेनेची साथ सोडली आहे.
नगर परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीची शेवटची सभा बुधवारी झाली. ट्रक टर्मिनससाठी जागा पूर्णपणे नगर परिषदेच्या ताब्यात ठेवायची की विकासकाला निम्मी जागा देऊन निम्मी जागा नगर परिषदेकडे ठेवायची, या विषयावर या सभेत चर्चा होणार होती. भय्या मलुष्टे आणि उज्ज्वला शेट्ये यांच्याकडून शिवसेनेला सहकार्य मिळणार नाही, हे आधीच स्पष्ट झाले असल्याने शिवसेनेचे नगर परिषदेतील गटनेते प्रदीप साळवी आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाडिक यांनी वर्तमानपत्रातून पक्षादेश बजावला होता. त्यानुसार नगर परिषदेच्या सभेपूर्वी शिवसेना नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती आणि काही विशिष्ट ठरावांच्याविरोधात मतदान करण्याची सूचना त्यात करण्यात आली होती. विद्यमान कार्यकारिणीच्या काळात प्रथमच कोणत्याही पक्षाला पक्षादेश बजावण्याची वेळ आली. तीही शेवटच्या सभेत. त्यामुळे या सभेत काय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. ठरावाच्या मतदानाप्रसंगी मलुष्टे आणि शेट्ये यांनी शिवसेनेच्या सोबत न राहता भाजप व राष्ट्रवादीची साथ दिल्याने ठराव मंजूर झाला. ठराव मताला टाकण्यापूर्वी शिवसेनेचे गटनेते प्रदीप तथा बंड्या साळवी आणि उमेश शेट्ये यांची चांगलीच खडाजंगी झाली. शिवसेनेच्यावतीने नूतन नगराध्यक्ष राहुल पंडित आणि मधुकर घोसाळे यांनीही आक्रमक भूमिका मांडली.
२८ पैकी १५ नगरसेवक एकट्या शिवसेनेकडे होते. मात्र दोन सदस्य फुटल्यामुळे आणि भाजप, राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे शिवसेनेचा या सभेत नैतिक पराभव झाला. (प्रतिनिधी)
कीर शिवसेनेसोबत
दोन दिवसांपूर्वी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांना नोटीस पाठवणारे शिवसेनेचे मिलिंद कीर या सभेत शिवसेनेसोबतच राहिल्याचे चित्र दिसत होते. ट्रक टर्मिनसच्या ठरावाला शिवसेनेच्या सदस्यांनी हात उंचावून विरोध केला, तेव्हा मिलिंद कीर यांनीही हात वर केला होता.

Web Title: Strong politics in the last meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.