स्ट्रक्चरल आॅडिट म्हणजे पुलांची आरोग्य तपासणी

By admin | Published: August 5, 2016 12:44 AM2016-08-05T00:44:05+5:302016-08-05T02:04:36+5:30

पुलांचा घेतला जातो लेखाजोखा : दर सहा महिन्यांनी पुलांची पाहणी; तरीही देखभालीकडे दुर्लक्ष

Structural Aid is the bridge health check-up | स्ट्रक्चरल आॅडिट म्हणजे पुलांची आरोग्य तपासणी

स्ट्रक्चरल आॅडिट म्हणजे पुलांची आरोग्य तपासणी

Next

प्रकाश वराडकर --रत्नागिरी --महाड - पोलादपूर पुलाच्या दुर्घटनेमुळे महामार्गावरील जुन्या पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्ट्रक्चरल आॅडिट म्हणजे बांधकाम विषयातील तज्ज्ञांनी पुलाच्या बांधकामाचे व क्षमतेचे केलेले स्कॅनिंगच असते. तांत्रिकदृष्ट्या पुलाचे आरोग्य कसे आहे, याची विविध साधनसामग्रीमार्फत अत्यंत बारकाईने सखोल तपासणी केली जाते. पुलाचा टिकाऊपणा किती आहे, कोणते दोष आहेत व काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा लेखाजोखा मांडला जातो. एक किंवा दोन दिवसात हे स्ट्रक्चरल आॅडिट केले जाऊ शकते, असे तज्ज्ञांकडून घेतलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
महाडच्या पूल दुर्घटनेत अनेकांचा बळी गेला आहे. मृतदेह शोधण्याचे काम अद्याप सुरू आहे. केवळ ९ मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेत बुडालेल्या एस. टी.च्या दोन गाड्या तसेच अन्य छोटी वाहने अद्याप बेपत्ता आहेत. पूल कोसळण्याच्या या दुर्घटनेने हाहाकार उडवला आहे. राज्य सरकारलाही विरोधक आणि जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली आहे.
स्ट्रक्चरल आॅडिट म्हणजे काय? कोणत्या निकषांवर ही तपासणी होते, याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेतली असता अनेक मुद्दे समोर आले आहेत. सुमारे ३५ निकषांच्या आधारे बांधकामातील तज्ज्ञ अभियंत्यांकडून हे तपशीलवार आॅडिट करून घेतले जाते. पुलाचे बांधकाम कुठल्या प्रकारचे आहे? कॉँक्रीटचे आहे की दगडाचे? पुलाची लांबी, रुंदी किती? समुद्र किनाऱ्यापासून पूल किती अंतरावर आहे, याचीही तपशीलवार माहिती घेतली जाते. समुद्रापासून १५ किलोमीटर्स अंतरापर्यंत पूल असल्यास खाऱ्या हवेमुळे पुलाचे स्टील गंजून पूल कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे चांगल्या दर्जाचे व गंजप्रतिबंधक थर दिलेले स्टील बांधकामासाठी वापरले आहे की नाही, याची तपासणी केली जाते. स्टीलची झीज झाल्याचे आढळल्यास कोणते उपाय करावेत, हे नमूद केले जाते.
पुलाचे जोडरस्ते कोणत्या स्थितीत आहेत. त्यांना भेगा गेलेल्या आहेत का, हे रस्ते दबलेले आहेत का, याबाबत निरीक्षण नोंदवले जाते. जोडरस्ते व भराव खचलेला असेल तर पुलाच्या टिकाऊपणाला धोका निर्माण होऊ शकतो. पुलाचे कठडे (पॅराफीट वॉल) सुस्थितीत आहेत का, पुलाचा पाया व खांब सुस्थितीत आहेत का, पाण्याच्या प्रवाहामुळे झीज झाली आहे का, झीज झाली असेल तर त्यावर काय उपाययोजना कराव्यात, याचा तपशीलही या आॅडिट रिपोर्टमध्ये तज्ज्ञांकडून नोंदवला जातो.
पुलाचे खांब, साईड वॉल, पुलाच्या स्लॅबच्या खालील बाजूने गवत, झुडपे वाढलेली असतील तर ती पुलाचे आयुष्य कमी करतात. असे गवत, झुडपे तोडणे व त्यांची मुळे रासायनिक प्रक्रियेद्वारे समूळ नष्ट करणे आवश्यक असते. याबाबतचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवले जाते. पुलाचे खांब, साईड वॉल यांचे दगड निघाले आहेत का, खांब पाण्याच्या दबावाने प्रवाहाच्या दिशेने झुकले असतील किंवा या खांबाच्या मुळाशी सिमेंट कॉँक्रीटची झीज झाली असेल, दगड वा कॉँक्रीट निघाले असेल तर त्यावर तत्काळ उपाय करावे लागतील, याचीही तज्ज्ञांकडून नोंद केली जाते. या तपासणीसाठी खास प्रकारचे हात असलेल्या जेसीबीचा वापरही केला जातो.
पुलाच्या स्लॅबखाली खांबांवर असलेली बेअरिंग व्यवस्थित आहेत का, याची तपासणी केली जाते. प्रत्येक स्लॅबला जोडणाऱ्या खांबांखाली ही बेअरिंग बसवली जातात. पुलावरून वाहने जाताना पुलाची कंपने किती आहेत, याचे मोजमाप यंत्रसामग्रीमार्फत केले जाते. ही कंपने (व्हायब्रेशन्स) अधिक असतील तर ती कमी करण्याचे उपाय सुचवले जातात. बेअरिंगची तपासणी करावी लागते. त्यात काही दोष असेल तर दुरुस्ती होते किंवा बेअरिंग बदलणे आवश्यक ठरते. आर्च ब्रीज असेल तर जॉर्इंट्सची तपासणी केली जाते. स्लॅब असेल तर त्याचे स्टील गंजून उघडे पडले आहे का याची तपासणी होते. पुलाचे स्ट्रेचिंग (तारा ओढून ठेवणे) केलेले असेल तर असे स्ट्रेचिंग हे मुळात होते तसे नसल्यास ते मूळ स्थितीत आणण्यासाठी उपाय सुचवले जातात. रेलिंग तुटलेले असेल तर दुरुस्तीची सूचना केली जाते.
पुलाच्या दोन स्लॅबमधील एक्स्पांशन जॉर्इंटची क्षमता तपासली जाते. या जॉर्इंटची क्षमता कमी असेल तर ते बदलण्यास सुचविले जाते. पुलाच्या स्लॅबवरील पाण्याचा निचरा होत नसेल, पाणी साचून राहात असेल तर त्यासाठीच्या उपाययोजना सुचवल्या जातात. खांबांचे, साईड वॉलचे बांधकाम हे दगडी असो किंवा कॉँक्रीटचे असो, त्यामध्ये वीप पोल्स (पाण्याचा दबाव येऊ नये म्हणून होल्स ठेवणे) आहेत काय, नसतील तर त्यामुळे खांबांवर पाण्याच्या प्रवाहाचा दबाव येतो काय, याचे निरीक्षण होते. संपूर्ण पुलाचेच स्कॅनिंग या आॅडिटमध्ये होते. पूर्ण तपासणीनंतर पुलाचे आयुष्य बांधकामाच्यावेळी किती होते व अनेक वर्षे वापर झाल्यानंतर पुलाचे आयुष्य किती आहे, याबाबतचा तपशीलवार अहवाल स्ट्रक्चरल आॅडिट करणाऱ्या तज्ज्ञांकडून राज्य सरकारला सादर केला जातो. त्यानुसार किती उपाययोजना केल्या जातात, हा मात्र संशोधनाचा विषय आहे.


सहामाही इन्स्पेक्शन; तोंड दाबून बुक्क्यांचा मार
महामार्गावरील पुलांची दर सहा महिन्यांनी विभागवार इन्स्पेक्शन (तपासणी) केले जाते. तपासणी अहवालात उपाय सुचविले की, वरिष्ठांकडून देखभाल उपाययोजनांच्या प्रस्तावांना केराची टोपली दाखवली जाते किंवा तुम्हीच कामे करून घ्या, असे सांगितले जाते. पदरमोड करून ही देखभाल, दुरुस्ती कामे याआधी केली जायची. नेहमी हे शक्य नसते. त्यामुळे कनिष्ठस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. गेल्या काही काळात याच कारणाने पुलांच्या तपासणी अहवालात गुड कंडिशन असा शेरा मारला जातो. महाड - पोलादपूर पुलाबाबत असाच प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांमुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची कोंडी होत असून, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. चूक कोणाची व शिक्षा कोणाला, असा हा प्रकार असून, याचीही दखल राज्यकर्ते घेणार की नाहीत, हाच कळीचा मुद्दा आहे.

दहा टन क्षमतेच्या पुलांवरून
४० टनी ट्रेलर धावताहेत...
शंभर वर्षांपूर्वी पूल उभारणी करताना त्यावरून ८ ते १० टन वजनाची वाहने जातील, असाच साधा सरळ हिशेब ठेवून बांधकाम केलेले असणार हे स्पष्ट आहे. मात्र, त्यानंतर या पुलांवरून आता ३० ते ४० टन वजनाचे ट्रेलर दररोज धावतात. महामार्गावर असलेले अनेक जुने पूल आजच्या घडीला या क्षमतेचे राहिलेले नाहीत. ते कालबाह्य झालेले आहेत. तरीही त्यावरून वाहतूक सुरूच आहे. नागरिकांचा जीव धोक्यात आहे. त्याबाबत राज्यकर्त्यांना खेद नाही की खंतही नाही. महाडमधील पुलाची दुर्घटनाही याच अनास्थेमधून घडली असून, अनेकांचा नाहक बळी गेला आहे.


पावसात स्ट्रक्चरल आॅडिट?
महाड दुर्घटनेनंतर विरोधकांचा राजकीय मारा चुकवण्यासाठी व त्यांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची घोषणा केली आहे. स्ट्रक्चरल आॅडिट पावसाळा सुरू होण्याआधी पुलाखालील पाणी कमी झालेले असताना केले जाते. पुलाच्या पायथ्याशी, खांबाच्या मुळाशी काय स्थिती आहे, याची तपासणी होणे अत्यावश्यक असते. त्यावरच वरून टापटीप दिसणाऱ्या पुलाचे भवितव्य अवलंबून असते. सध्या पावसाळा आहे. पुलाखालील पाण्याची पातळी वाढलेली आहे. पावसाळ्यात वा येत्या काही महिन्यात स्ट्रक्चरल आॅडिट कसे काय होणार, असा सवाल तज्ज्ञांसमोर आहे. याचे उत्तर आता मुख्यमंत्र्यांनीच देणे योग्य ठरेल. आहे. याचे उत्तर आता मुख्यमंत्र्यांनीच देणे योग्य ठरेल.

Web Title: Structural Aid is the bridge health check-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.