सावर्डेत उभारले हटकेबाज विलगीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:11+5:302021-06-10T04:22:11+5:30
चिपळूण : कोरोना विलगीकरण केंद्र उभारणीच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये लोकसहभागाची चळवळ सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निधीवर भार न पडता दानशूर ...
चिपळूण : कोरोना विलगीकरण केंद्र उभारणीच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये लोकसहभागाची चळवळ सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निधीवर भार न पडता दानशूर लोकांमधून विलगीकरण केंद्र साकारले जात आहेत. सावर्डे येथेही विलगीकरण केंद्र बुधवारी सुरू झाले. अगदी जेवणापासून टीव्ही व मनोरंजनाची साधने, वाचनासाठी पुस्तके, कला जपण्यासाठी पेंटिंग, आदी विविध सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या केंद्रात जणू घरच्यासारखेच सर्व वातावरण तयार केले आहे.
गृह विलगीकरणाची सुविधा बंद झाल्यानंतर प्रशासनाने ग्रामपंचायत स्तरावरच विलगीकरण केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील ३२ गावांत विलगीकरण केंद्र सुरू होत आहेत. सावर्डे आमदार शेखर निकम यांच्या सह्याद्री शिक्षण संस्थेची भक्कम साथ मिळाल्याने येथे तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात वेगळे ठरेल असे विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, डाॅ. ज्योती यादव, सावर्डे पोलीस निरीक्षक धुमाळ, माजी सभापती पूजा निकम, डॉ. राणीम, सरपंच समीक्ष बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, ग्रामविकास अधिकारी के. डी. पवार, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विलगीकरण केंद्राचे उद्घाटन झाले.
येथे लोकसहभागातून म्युझिक, पेंटिंग, मनोरंजनासाठी टीव्ही, साऊंड सिस्टीम, विधायक प्रोत्साहन देणारी वाचनीय पुस्तके, स्टीमर, पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी गरम पाणी, हँडग्लोज, फेस शिल्ड, पीपीई कीट, आदी सर्व व्यवस्था केली आहे. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना मोफत जेवण देण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेने केंद्रासाठी दोन कर्मचारीही दिले आहेत. २० बेडमध्ये महिलांसाठी १० राखीव आहेत.
अधिकाऱ्यांनी या हटकेबाज विलगीकरण केंद्राचे कौतुक केले. यावेळी माजी सभापती पूजा निकम म्हणाल्या की, हा विलगीकरण केंद्र नसून, बाधित रुग्णांना आधार केंद्र ठरणार आहे. एखादे वेळेस घरातही नसेल, असे प्रसन्न वातावरण आणि सुविधा येथे निर्माण केल्या आहेत. कोरोनाची लक्षणे जाणवल्यावर घरी लपून न राहता औषधोपचार घ्यायला हवेत.
...................
१६ खासगी डॉक्टर देणार सेवा
सावर्डे येथे एकूण १६ खासगी डॉक्टर आहेत. हे सर्वजण निश्चित वेळा ठरवून विलगीकरण केंद्रात मोफत वैद्यकीय सेवा देणार आहेत. एकूण सावर्डेत घरपण देणारे केंद्र सुरू करून ग्रामपंचायतीने रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे.