घरात ४० किलो मांस ठेवणाऱ्या महिलेला अटक
By admin | Published: March 15, 2015 12:16 AM2015-03-15T00:16:20+5:302015-03-15T00:17:43+5:30
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला़
रत्नागिरी : जनावराचे ४० किलो मांस घरात बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांनी राजिवडा येथे एका महिलेला अटक केली आहे. शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला़ यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते़ हे मांस नेमके कसले आहे, याचा उलगडा अजून झालेला नसून, ते तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव रेहना गफर पकाली (वय ४०, राजीवडा) असे आहे़ या महिलेच्या घरात जनावराचे मांस ठेवल्याची खबर येथील नागरिकांनी शिवसैनिकांना दिली़ शिवसैनिकांनी ही माहिती शहर पोलिसांना दिली़ पोलिसांनी कारवाई करून पकाली हिच्या घरातील तब्बल ४० किलो वजनाचे जनावराचे मांस ताब्यात घेतले़ मात्र, हे मांस कोणत्या जनावराचे आहे, हे समजू शकले नाही़ मांसाची तपासणी करण्यासाठी ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे़
या घटनेमुळे येथील वातावरण काही काळ तंग होते़ मात्र, पोलिसांनी संशयित महिलेला अटक केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे़ शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रमोद कांबळे यांनी फिर्याद दिली आहे़ अधिक तपास पोलीस करत आहेत़ (शहर वार्ताहर)