घराच्या गॅलरीतच अडकले विवाहबंधनात-- पाच जणांच्या उपस्थितीत विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:29 AM2020-04-29T11:29:08+5:302020-04-29T11:30:42+5:30
या सोहळ्याबद्दल बोलताना भाऊ मोहिते यांनी हा उपक्रम महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अत्यंत साधेपणाने व कमी व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला असल्याने खर्चात बचत झाली आहे.
दापोली : लग्न म्हटले की, वधू - वरांच्या घरात उत्साहाचे वातावरण असते. वऱ्हाड्यांची गर्दी असते तर हॉलही सजलेला असतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ना बॅण्डबाजा ना व-हाडी, तर चक्क घराच्या गॅलरीत लग्न लावून इमारतीतील वऱ्हाडींनी खिडकीतूनच पुष्पवृष्टी केल्याचे दापोली तालुक्यातील जालगाव येथे घडले.
दापोली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व दापोली नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अनंत उर्फ भाऊ मोहिते यांच्या मुलाचा विवाह लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच लोकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला. भाऊ मोहिते यांचा मुलगा अनिरुद्ध व तालुक्यातील गिम्हवणे येथील सुनील विठ्ठल महाडिक यांची कन्या सेजल हे केवळ पाच लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स राखून बंधनात अडकले.
या लग्न सोहळ्यासाठी बेंडबाजा, फटाके, लाऊड स्पीकर आदी गोष्टींचा वापर टाळण्यात आला होता. कोणत्याही पाहुणे मंडळींना बोलावण्यात आले नव्हते. बौद्ध उपासक दिलीप जाधव यांनी हा विवाह सोहळा पार पाडल्यावर इमारतीतील विविध सदनिकांमध्ये राहात असणाºया कुटुंबातील व्यक्तिंनी आपापल्या खिडकीतून लांबूनच वधू-वरांवर पुष्पवृष्टी केली.
या सोहळ्याबद्दल बोलताना भाऊ मोहिते यांनी हा उपक्रम महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अत्यंत साधेपणाने व कमी व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला असल्याने खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे वाचलेले पैसे आपण सामाजिक कामाला देणार असल्याचे भाऊ मोहिते यांनी स्पष्ट केले. या लग्न सोहळ्याची सध्या दापोलीत चर्चा सुरू आहे.
मास्कचाही वापर
हा विवाह सोहळा दुपारी ४ वाजता पार पडला. विवाहाच्या आधी त्याच ठिकाणी साक्षगंध विधी देखील पार पडला. या सर्व विधींच्या वेळी वधू, वर, लग्न लावणारे बौद्ध उपासक, वधू व वराची आई या सर्वांनी चेहऱ्यावर कोरोनारोधक मास्क लावला होता.