कोरोनाबाबत विद्यार्थ्यांचे हस्तलिखित करण्याचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:01+5:302021-04-01T04:32:01+5:30
दापोली : कोरोनाच्या वर्षभराच्या प्रादुर्भाव काळात सर्वांत जास्त नुकसान शालेय विद्यार्थ्यांचे झाले आहे. त्याचीच दखल घेत चंद्रनगर येथील जिल्हा ...
दापोली : कोरोनाच्या वर्षभराच्या प्रादुर्भाव काळात सर्वांत जास्त नुकसान शालेय विद्यार्थ्यांचे झाले आहे. त्याचीच दखल घेत चंद्रनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बाबू घाडीगावकर यांनी ‘कोरोेना - एक संधी’ असे हस्तलिखित मुलांकडून तयार करून घेण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे.
गेल्या वर्षभरापासून शाळा नियमित सुरू होऊ शकलेल्या नाहीत. बऱ्याच शाळांमधून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून धडे दिले जात आहेत. जानेवारीपासून उच्च प्राथमिक शाळांचे वर्ग कोरोनासंबंधीचे सर्व शासकीय निर्देश पाळून मर्यादित वेळेत सुरू झाले आहेत. मात्र मुलांना या संकटाला सामोरे जात शिक्षण घ्यावे लागत आहे. त्याची दखल घेत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर या शाळेतील विषयशिक्षक बाबू घाडीगावकर यांनी ‘कोरोना - एक संधी’ याच विषयावर विद्यार्थ्यांकडून हस्तलिखित तयार घेतले आहे.
इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे हस्तलिखित तयार केले आहे.
या हस्तलिखितातील कथा, निबंध, कवितांचे लेखन विद्यार्थ्यांनीच केले आहे. घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेजल कोळंबे या विद्यार्थिनीने हस्तलिखिताचे संपादन केले आहे. लक्ष्मी शर्मा, श्रावणी मुलुख, वेदांत पवार, धीरज शिगवण, सेजल कोळंबे यांनी त्याचे सुलेखन केले आहे. कोरोना हा विषय निवडून विद्यार्थ्यांनी निबंध, कविता, कथा, कल्पनाविष्कार, आत्मवृत्तात्मक तसेच पत्रलेखन केले आहे. हस्तलिखिताची सजावट धीरज शिगवण या विद्यार्थ्याने केली आहे.